विविधा: ज्ञानकोशकार भिडे

माधव विद्वांस

ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे यांची आज जयंती. त्यांचा जन्म 6 जून 1909, रोजी अष्टे (सांगली) येथे झाला. त्यांची कन्या लेखिका प्रतिभा रानडे यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर ते सांगलीला मामाकडे शिक्षणासाठी गेले; पण त्यांचे मामाकडे जमले नाही. त्यांनी बाहेर कष्ट करून पहिल्या श्रेणीतच आपले मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. आष्ट्याहून नोकरीच्या निमित्ताने ते कोल्हापूर येथे आले. एका शिंप्याच्या दुकानात त्यांनी हिशेबनीसांचे काम पत्करले.

तेथे युरोपियन अधिकाऱ्यांचे कपडे शिवले जात. त्यासाठी त्या शिंप्याने यरोपियन कपड्यांच्या शिलाईबाबतची माहिती देणारी मासिके मागविली होती. त्यावरून त्यांनी शिंपीकोश तयार केला. त्यांनी “अभिनव मराठी ज्ञानकोश’ नावाचा ज्ञानकोश रचला. ते उत्तम छायाचित्रकार होते. “लाइफ’ सारख्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकानांही त्यांच्या छायाचित्रणाची दखल घेतली होती. भालजी पेंढारकर आणि भीमसेन जोशी यांच्याशी त्यांचे चांगले स्नेहसंबंध होते. त्यांनी “चित्रपटसृष्टी’ या नावाचे मासिक सहा वर्षं चालविले होते. 80 वर्षांपूर्वी अनेक अडचणींवर मात करून त्यांनी व्यावहारिक ज्ञानकोश संपादित केला. जयंतराव नारळीकर, डॉ. स. अ. डांगे, डॉ. स. गं. मालशे, न. वि. गाडगीळ यांच्यासारख्या अनेकांचे लेखनसहकार्याने त्यांनी व्यावहारिक ज्ञानकोशाचे पाच खंड प्रसिद्ध केले. तसेच मुलांसाठी बालकोशाचे दोन खंड प्रसिद्ध केले. त्यांनी तयार केलेल्या बालकोशाच्या पहिल्या भागात (1942) जगाच्या उत्पत्तीपासून मनुष्याच्या उत्पत्तीपर्यंतच्या शास्त्रीय विषयांचा परामर्श घेण्यात आला होता. मुलांसाठी नकाशाची योजना आखणारे भिडे हे साऱ्या भारतातील पहिले कोशकार होते.

वर्ष 1933 मधे वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी व्यावहारिक ज्ञानकोशाची त्यांना कल्पना सुचली. त्यावेळी त्यांचे शिक्षण फक्‍त मॅट्रिकपर्यंत झाले होते. आर्थिक पाठबळही नव्हते. पण ज्ञानकोशाची निर्मिती ही आपले इतिकर्तव्य आहे हे ठरवून त्यांनी 20 एप्रिल 1931 रोजी मा. त्र्य. पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली व्यावहारिक ज्ञानकोश मंडळाची स्थापना केली व 20 मार्च 1933 रोजी “व्यावहारिक ज्ञानकोश मंडळ लिमिटेड’ अशी कंपनी काढली.

1934 मधेच व्यावहारिक ज्ञानकोशाचा पहिला खंड प्रसिद्ध केला. पुढे इतिहास, इंग्रजी आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन 1944 साली ते एम. ए. झाले. पुढच्याच वर्षी ते बीटी झाले. शिक्षकी पेशा पत्करून त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. संशोधक वसंतराव गोवारीकर ज्ञानकोशकार भिडे यांचे शिष्य, त्यांच्या बद्दल ते म्हणतात, “सर आम्हाला सांगायचे की, अभ्यास करायचा तो फक्‍त परीक्षा पास होण्यासाठी नाही, तर त्या विषयाच्या ज्ञानासाठी. जे काय शिकायचे, जे काय करायचे ते सगळे देशासाठीच. महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर कोल्हापुरात उसळलेल्या दंगलीमधे त्यांच्या घरातील सामान, संपादित कोशलेखनासह त्यांचे कार्यालय जाळण्यात आले. या वेळी कोल्हापूरचे छ. शहाजी राजे यांची मात्र त्यांना सहानुभूती व सहकार्य मिळाले. 8 जून 1981 रोजी त्यांचे मुंबई येथे निधन झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.