प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्य परीक्षा परिषदेतर्फे डीएल. एड. (द्वितीय वर्ष) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे डीएल. एड. परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, डीएल. एड. ची परीक्षा 10 ते 18 जानेवारी या कालावधीत होणार आहे. तर, सीबीएसईतर्फे सीटीईटी 9 ते 13 जानेवारी या दरम्यान होणार आहे.
राज्यातील अनेक उमेदवारांनी दोन्ही परीक्षांसाठी अर्ज भरले आहेत. दोन्ही परीक्षांचा कालावधी समान असल्याने दोन्ही परीक्षा देणे उमेदवारांना अडचणीचे ठरणारआहे.
या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना डीएल. एड. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. सीटीईटी आणि डीएल. एड परीक्षेला असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणीचा विचार करून डीएल. एड. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देश परीक्षा परिषदेला देण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.