घंटागाडी कर्मचाऱ्यांना “बाप्पा’ पावले

दिवाळीसाठी प्रत्येकी 30 हजारांचे सानुग्रह अनुदान : यंदा 10 हजारांची वाढ

पिंपरी – पालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाकरिता विशेष बाब व बक्षीस रक्कम म्हणून 30 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत सानुग्रह अनुदानाला हिरवा कंदील दर्शविण्यात आला. यंदा सानुग्रह अनुदानात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या धसक्‍याने मागणी आधीच हा प्रस्ताव मार्गी लागल्याने घंटागाडी कर्मचाऱ्यांना “बाप्पा’ पावले आहेत. महापालिकेत सुमारे 400 घंटागाडी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना अस्थापना कामगारांप्रमाणे 8.33 टक्के बोनसचा लाभ मिळत नाही.

दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर महापालिका कर्मचारी महासंघाकडून या कामगारांना सानुग्रह अनुदानाची मागणी केली जाते. त्यानंतर स्थायी समितीमध्ये याबाबत निर्णय घेतला जातो. तथापि, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांवर लागण्याची शक्‍यता आहे. दिवाळीचा सण दीड महिन्यांवर आला आहे. आचारसंहिता काळात सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेपुढे त्यास मंजुरी देण्याचा सदस्य प्रस्ताव आयत्यावेळी मांडण्यात आला. विशेष म्हणजे सन 2018-19 मध्ये दिवाळी सणाकरिता 20 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा त्यात 10 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना प्रत्येकी 30 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार असल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे.

ठेकेदारांच्या “बॅड प्रॅक्‍टीस’ला लगाम

महापालिकेत सुरक्षेसह विविध कामांसाठी ठेकेदारी पद्धतीवर हजारो कामगार, मजूर कार्यरत आहेत. या कामगारांना महापालिकेकडून किमान वेतन अदा केले जाते. मात्र, असताना ठेकेदार त्यांच्याकडून एटीएम कार्ड, बॅंक पासबूक घेऊन त्यांच्या वेतनात “वाटेमारी’ करतात. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच आंदोलने देखील झाली आहेत. याबाबत आजच्या स्थायी समिती सभेत चर्चा झाली. त्यावर ठेकेदारांची ही “बॅड प्रॅक्‍टीस’ बंद पाडण्यासाठी संबंधित कामगारांचे वेतन जमा झाल्यानंतर पूर्ण वेतन मिळाल्याचे ऑडिओ व व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती सभेत प्रशासनाला दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here