कोरेगाव भीमा -लॉकडाऊनमध्ये गावी पायी जाणाऱ्या मजुरांना पोलीस प्रशासनाने शिक्रापूर चेक नाक्यावर थांबवून काही मजुरांना कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील अल अमीन कॉलेजमध्ये ठेवले होते. निवारा केंद्रासाठी अल अमीन कॉलेजचे प्रमुख नासिर शेख, अमीर इनामदार, रुमाना शेख, जाहिद शेख आदींनी सहकार्य केले. हे मजूर गावी जाण्यासाठी आग्रही असल्याने प्रांत संतोषकुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख यांनी मजुरांना आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी तात्काळ प्रयत्न केले. त्यांचा गावी परतण्याचा मार्ग मोकळा केला. देशमुख यांनी कॅम्पला भेट दिली. मजुरांच्या समस्या जाणून घेतल्या.
त्यांना गावी जाण्याची परवानगी देण्यात येऊन शासकीय बसमध्ये त्यांना सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार होते; पण शासनाने राज्यातील लोकांऐवजी परप्रांतीयांना अगोदर सोडण्याचा निर्णय घेतल्याने मजुरांना गावी सोडण्यासाठी अडचण निर्माण झाली. तलाठी अश्विन कोकाटे यांनी पुढाकार घेत खासगी गाड्यांची व्यवस्था केली. “आयएमपी’चे मालक व दानशूर व्यक्ती प्रकाश धोका यांनी गाड्यांच्या सर्व डिझेलची व्यवस्था करत मदतीचा हात दिला.
मजुरांनी पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, उपनिरीक्षक राजेश माळी, सहायक उपनिरीक्षक अविनाश थोरात, सचिन मोरे, ग्रामसेवक राजेंद्र सात्रस, तलाठी अश्विनी कोकाटे, कोतवाल संतोष शिंदे सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश सुरेश गव्हाणे यांचे आभार मानले. रात्री उशिरा मजूर गावी रवाना झाले.