नगर – जिल्ह्यातील 45 लाख लोकसंख्येचं आरोग्य सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रिक्त पदामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार विस्कळीत आहे, असं चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात एकूण 487 पदे मंजूर केलेली आहेत. त्यापैकी 358 पदे आजवर भरल्या गेलेली असून 130 पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
शिवाय परिचारिका पदाच्या 100 जागा असून एक पद रिक्त आहेत. मात्र, परिचारिका पदाच्या ज्या जागा भरल्या गेल्यात त्यातील 23 जागा अस्थायी स्वरूपाच्या आहेत. सध्या जिल्हा सामान्य रूग्णालयात पद भरतीची समस्या भेडसावत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रिक्त पदे भरणे हे राज्य शासनाच्या आरोग्य विभागा समोरचं मोठं आव्हान आहे.
सध्या हवामान बदलामुळे जिल्ह्यात अनेक आजार बळावत आहे. शिवाय डेंग्यू च्या रुग्णात देखील वाढ झालेली आहे. सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने रुग्णाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे खाजगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसते. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी रिक्तपदे भरली जावीत, शिवाय अस्थायी पदाबरोबरच स्थायी पदे देखील भरल्या जावीत, अशी नगरकरांची भावना आहे.
जिल्हा रुग्णालय प्रशासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवून आरोग्य सेवा सुरू केल्यात. मात्र, आरोग्य सेवा देण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्गच नसल्याचं गंभीर चित्र सध्या सामान्य रुग्णालयात आहे. असंच चित्र अन्य तालूक्यांत देखील आहे.
वर्ग 1, वर्ग 2 – मंजूर 28, भरलेली 28, रिक्त – 0, वर्ग 3 – मंजूर 69, भरलेली – 40, रिक्त – 30, वर्ग 4 – मंजूर 390, 290 भरलेली, रिक्त – 100
तालुकानिहाय रिक्त पदे
पाथर्डी -2, कर्जत – 3, श्रीगोंदा – 3, पारनेर – 4, राहाता – 11, अकोले – 9, जामखेड – 2, नेवासा – 3, संगमनेर – 6, राहूरी – 10, शेवगाव – 4, कोपरगाव – 5, श्रीरामपुर – 2