रोहित पवारांनी घातले जिल्हा परिषदेत लक्ष

जामखेड-कर्जत मतदारसंघातील प्रश्‍नांच्या निमित्ताने दिली भेट

नगर – कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे यांना पराभूत करून जायंट किलर ठरलेले आमदार रोहित पवार यांनी काल उशिरा जिल्हा परिषदेत भेट दिली. पंचायत समितीसह आरोग्य विभागात कमी असलेल्या कर्मचारी वर्ग व इतर प्रश्‍नासंदर्भात पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.मात्र या भेटीची जिल्हा परिषद वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

आमदार रोहित यांनी कर्जत व जामखेड पंचायत समितीत तसेच आरोग्य विभागामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच इतर प्रश्‍नांसंदर्भातही त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर पवार यांनी प्रथमच जिल्हा परिषदेला भेट दिली. यावेळी आमदार पवार यांचा समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रोहित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू असून जिल्हा परिषदेत सध्या भाजपात प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे गटाची सत्ता आहे.विखे व पवार यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे.त्यात राष्ट्रवादीसह दोन्ही कॉंग्रेसला गेल्या काही वर्षात मरगळ आली होती. ती या विधानसभा निवडणुकीच्या यशामुळे काही अंशी झटकली गेली असली तरी राष्ट्रवादीला जिल्ह्यात नवनेतृत्वाची गरज आहे.

ती पोकळी रोहित यांच्या रूपाने आता भरली जावू शकते.तसेच कॉंग्रेस व सर्व विखे विरोधकांना त्यांच्याविरोधात एक आश्‍वासक चेहरा जो हवा आहे तो रोहित यांच्यात शोधला जावू शकतो. जिल्हा बॅंकेसह साखर कारखाने व इतर महत्वाच्या निवडणुका नगर जिल्ह्यात पुढील वर्षभरात होणार आहेत.त्यात रोहित दोन्ही कॉंग्रेसकडून एक युवा चेहरा म्हणून पुढे येवू शकतो असा अंदाज राजकीय वर्तुळातून बोलला जात आहे. त्यात पवार यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषदेला दिलेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.