अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच मुख्य संशयित अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला मंगळवारी या प्रकरणातील ड्रग्स अँगलने होणाऱ्या चौकशीनंतर अटक करण्यात आले. बुधवारी तिची रवानगी मुंबईच्या भायखळा जेलमध्ये झाल्यानंतर केवळ महिला कैद्यांची असलेले हे कारागृह पुन्हा चर्चेत आले आहे. गँगस्टर हसीना पारकर, मारिया सुसाइराज, इंद्राणी मुखर्जी, सुधा भारद्वाजनंतर आता रिया चक्रवर्ती अशा अनेक ‘सेलिब्रिटी’ गुन्हेगारांमुळे तसेच कैद्यांना झालेली विषबाधा, अमानुष मारहाणीत एका आरोपीचा झालेला संशयास्पद मृत्यू आशा विविध कारणांनी प्रकाशझोतात आलेल्या ‘भायखळा जेल’ चा इतिहास जाणून घेणे रंजक ठरेल.
भायखळा जेलमध्ये एकूण 18 बराकी आहेत तर 350 महिला वअंडर ट्रायल गुन्हेगारांना इथे ठेवले जाऊ शकते. मुंबईतील एकमेव केवळ महिलांसाठी असणाऱ्या या ब्रिटिशकालीन जेलमध्ये 90 टक्के अधिकारी आणि कर्मचारी केवळ महिला आहेत. बाकी 10 टक्के पुरुष जेल कर्मचारी इथे कार्यरत आहेत.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची गँगस्टर बहीण हसीना पारकर, नेव्ही ऑफिसर हत्याकांडातील आरोपी मारिया सुसाईराज, ड्रग सिंडिकेट चालवणारी बेबी पाटणकर, शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी, भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी सामाजिक कार्यकर्ती सुधा भारद्वाज यांच्यासह अनेक गुन्हेगार महिलांमुळे भायखळा जेल नेहमीच चर्चेत राहिले आहे. 2018 साली महिला कैद्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटनेव्यतिरिक्त येथील कैदी मंजुळा शेट्ये हिला पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे तिचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता.
आता सुशांत केसमध्ये ड्रॅग अँगल पुढे आल्यानंतर रिया चक्रवर्ती ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर तिची रवानगी भायखळा जेलमध्ये करण्यात आली. रियल एनडीपीएस ऍक्टखाली 16/20 कलामांतर्गत अटक झाली असून ती आता 22 सप्टेंबरपर्यंत भायखळा जेलमध्ये राहणार आहे.