मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी 2000 रुपयांच्या गुलाबी नोटांवर मोठा निर्णय घेतला आणि त्या चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर अनेकांकडून सरकारवर टीका करण्यात आली. 2000 च्या नोटबंदीच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा नागरिकांना याचा फटका सहन करावा लागणार आहे. याबाबत अभिनेता आर माधवन याने एक गंमतीशीर पोस्ट शेअर केली आहे.
आर माधवनने त्याला पेट्रोल पंपावर आलेला अनुभवाविषयी सांगितले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, ‘6000 रुपयांचे डिझेल भरले आणि पेट्रोल पंपावर 2000च्या तीन नोटा दिल्या. हे पैसे देताना जणू 3 मृतदेहांचीच विल्हेवाट लावत असल्याची भावना मनात आली.’ अभिनेत्याच्या या अनुभवावरून काही लोक या नोटाबंदीची तुलना आधीच्या नोटाबंदीसोबत करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर २ हजारांची चलनी नोट बाजारात आणण्यात आली होती. यापूर्वी 1 हजार रुपयांची नोट ही सर्वाधिक मूल्याची नोट होती. मात्र आता 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत चलनात राहणार आहेत. म्हणजेच ज्यांच्याकडे सध्या 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना त्या बँकेतून बदलून घ्याव्या लागतील.
त्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच बँका आता ग्राहकांना 2000 च्या नव्या नोटा देणार नाहीत.