– हेमंत महाजन
हमास आणि इतर संघटनांनी इस्रायली सैन्यावर हल्ला करण्यासाठी संपूर्ण गाझामध्ये अनेक भुयारे बांधली आहेत. त्याबाबत…
इस्रायल गाझावर जमिनीवरून आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. लष्करी हल्ल्यासाठी इस्रायलने गाझा सीमेजवळ 1 लाख 60 हजारांपेक्षा अधिक सशस्त्र सैन्यासह, 3 लाख राखीव सैन्यांना देखील सज्ज केले आहे. परंतु गाझाच्या दाट लोकवस्तीच्या शहरी भागात लष्कर पाठवणे ही अतिशय धोकादायक मोहीम ठरू शकते. जमिनीवरील संभाव्य हल्ला किती मोठा असेल, म्हणजेच लष्कर शहराच्या किती आतमध्ये जाईल आणि किती काळासाठी हे अद्याप स्पष्ट नाही.
इस्रायलने गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनींना दक्षिणेतून पळून जाण्याचा दिलेला इशारा हा त्यांच्या लष्करी कारवाईचा पुढील टप्पा जवळ येत असल्याचे संकेत आहे.स्वतःचा प्रदेश सुरक्षित करणं हे इस्रायलसमोरील पहिलं आव्हान आहे आणि हमासच्या हल्लेखोरांना मारणं किंवा पकडणं महत्त्वाचे आहे.
शहरी युद्ध केंद्रात सैन्याला प्रशिक्षण
इस्रायल अनेक वर्षांपासून या लढाईची तयारी करतोय. मिनी-गाझा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिणेकडील लाखो-कोटी डॉलर्सच्या शहरी युद्ध केंद्रात ते सैन्याला प्रशिक्षण देतात. तिथे त्यांना दाटीवाटीने बांधलेल्या इमारती आणि भुयारांच्या चक्रव्यूहांचा सामना करत कसं लढायचं याचं प्रशिक्षण दिले जाते. कारण हमासने एक हजारांपेक्षा अधिक इमारती आणि भुयारे बांधली आहेत. आपला उद्देश साध्य करण्यासाठी लष्कराच्या विशेष तुकड्यांना सज्ज केले गेले आहे – रणगाडे आणि शस्त्रास्त्रांसोबतच सशस्त्र बुलडोझर हाताळणाऱ्यांना एकत्र करण्यात आले आहे.
गाझामधील भूमिगत भुयारांचे जाळे
हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून हमास वापरत असलेली गाझातील भुयारे लक्ष्य केली जात आहेत. गाझाच्या पहिल्या थरावरील भूपृष्ठावर सामान्य नागरिक राहतात. त्याच्या खाली दुसरा थर भूमिगत आहे जो हमास वापरतो. सध्या इस्रायली लष्कर गाझामधील जमिनीखालच्या थराला लक्ष्य करत आहे. ही सामान्य लोकांसाठी बांधलेले बंकर किंवा भुयारे नाहीत. ती फक्त हमास आणि इतर दहशतवादी संघटनांसाठी आहेत. जेणेकरून ते इस्रायली रॉकेटपासून वाचू शकतील व इस्रायलवर हल्ले सुरू ठेवतील. गाझामधील भुयारांच्या नेटवर्कच्या विस्ताराचा अंदाज बांधणे कठीण आहे. असे मानले जाते की ही भुयारे संपूर्ण गाझामध्ये पसरली आहेत.
गाझामध्ये 500 किमी लांबीची भुयारे
2021 मध्ये झालेल्या संघर्षानंतर इस्रायली लष्कराने गाझामध्ये पसरलेली 100 किमी लांबीची भुयारं नष्ट केल्याचं सांगितले होते. पण हमासने दावा केला होता की त्यांनी गाझामध्ये 500 किमी लांबीची भुयारं बांधली आहेत आणि इस्रायलच्या हल्ल्यात फक्त 5 टक्के भुयारं उद्ध्वस्त झाली होती.
2005 मध्ये इस्रायली सैन्याने आणि ज्यू स्थायिकांनी गाझामधून माघार घेतली. त्यानंतर तिथे भुयारे बांधण्याचे काम सुरू झालं. दोन वर्षांनंतर हमासने गाझावर ताबा मिळवला आणि त्यानंतर भुयारांचे जाळं मोठ्या प्रमाणावर विस्तारू लागले. हमास सत्तेवर येताच, इस्रायल आणि इजिप्तने त्यांच्या सीमारेषेवरून वस्तू आणि लोकांच्या येण्या-जाण्यावर बंधने आणली.
म्हणून हमासने भुयारांवर लक्ष केंद्रित करून तस्करी करणे सुरू केले. एकेकाळी गाझात सुमारे अडीच हजार भुयारे होती. या भुयारांमधूनच हमास आणि इतर कट्टरतावादी संघटनांना वस्तू, इंधन आणि शस्त्रे मिळायची. पण 2010 मध्ये इस्रायलने इजिप्तच्या सीमारेषेवर घातलेली बंधनं कमी केल्यावर ही तस्करी कमी होऊ लागली. इस्रायलने सीमारेषेद्वारे आयातीवरील निर्बंध कमी केले.
भुयारे नष्ट करण्याची मोहीम
2006 मध्ये, अतिरेक्यांनी इस्रायलच्या सीमारेषेखालून जाणाऱ्या एका भुयारातून इस्रायलमध्ये घुसून दोन सैनिकांची हत्या केली होती. गिलाड शालित नावाच्या सैनिकाचे अपहरण करून त्याला पाच वर्षे कैदी बनवून ठेवण्यात आलं होतं.2013 मध्ये इस्रायली सैन्याने गाझा पट्टीपासून त्यांच्या एका गावापर्यंत 18 मीटर खोल आणि 1.6 किलोमीटर लांबीचं भुयार शोधले होतं.
त्याच्या पुढच्या वर्षी इस्रायलने गाझामध्ये घुसून ही भुयारं नष्ट करण्याची मोहीम सुरू केली, ज्यात 30 भुयारे उद्ध्वस्त झाली. बोगद्यांची माहिती मिळाल्यास इस्रायली हवाई दल त्यांच्यावर बॉम्बचा वर्षाव करू शकतं. बंकर उद्ध्वस्त करणारे हे बॉम्ब जमिनीत खोलवर जातात. मात्र, यामुळे काही निष्पाप लोकांचा बळीही जाऊ शकतो.
हमासची ही भुयारं कशी आहेत?
सीमापार करण्याकरता भुयारं अतिशय मूलभूत असतात, त्यांच्यासाठी कोणतीही तटबंदी नसते आणि इस्रायली सैनिकांवर हल्ला करणे हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु गाझाच्या आत असलेल्या भुयारांचा उद्देश वेगळा आहे. हमासला तिथे दीर्घकाळ राहायचंय. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केलेल्या असतात जेणेकरून तिथे दैनंदिन आयुष्य जगता येईल. तिथे त्यांचे नेते लपून बसतात. त्यांची कमांड अँड कंट्रोल सिस्टीमही तिथेच आहे. वाहतुकीशिवाय, कम्युनिकेशनसाठीही या भुयारांचा वापर केला जातो. त्यामध्ये विजेचीही सोय आहे.
भुयारे खोदण्यात हमासने नैपुण्य मिळवले आहे. गाझामधील भुयारे जमिनीपासून 30 मीटर खाली असावत. त्यात प्रवेश करण्यासाठी घरांच्या तळघरांमधून इतर सार्वजनिक ठिकाणांहूनही भुयारांमध्ये प्रवेश करता येतो. इस्रायलचा आरोप आहे की, हमासने गाझामधील लोकांना मदत करण्यासाठी दिलेली कोट्यवधींची आंतरराष्ट्रीय मदत भुयारे तयार करण्याकरता वापरली आहे. आता झालेल्या हमासच्या हल्ल्यात यापैकी काही भुयारांचा वापर झाला आहे. इस्रायलने 2021 मध्ये भुयारे डिटेक्शन सेन्सर बनवले. मात्र अनेक भुयारे इस्रायलने बनवलेल्या भूमिगत अँटी-टनल डिटेक्शन सेन्सर्सपेक्षा खोल आहेत. अनेक भुयारे सेन्सरने पूर्णपणे डिटेक्शन केली जाऊ शकत नाही.
भुयारे सर्वात मोठा अडथळा
हल्ला होणार आहे हे लक्षात येताच हमास सामान्य जनतेचा ढाल म्हणून वापर करतील. याच कारणास्तव इस्रायलला अनेकदा हल्ले थांबवावे लागलेत. भुयारांच्या नेटवर्कमुळे इस्रायली लष्कराच्या तंत्रज्ञानाची आणि गुप्तचर यंत्रणेची ताकदही अपुरी पडत आहे. हमासकडे या बोगद्यांच्या नेटवर्कमधे दारूगोळा भरण्यासाठी खूप वेळ मिळाला आहे.हमास अचानक हल्ला करून इस्रायली सैनिकांचे अपहरण देखील करू शकतो.
थोडक्यात, इस्रायलच्या जमिनीवरील हल्ल्याला यश मिळण्यामध्ये आणि हमासला पूर्णपणे बरबाद करण्यासाठी गाझा पट्टीतील भुयारे हा सर्वात मोठा अडथळा आहे. शहरातली आणि भुयारामधील लढाईमध्ये दोन्ही बाजूला पुष्कळ नुकसान सहन करावे लागेल आणि ही लढाई कोण, केव्हा जिंकेल हे केवळ येणारा काळच सांगू शकतो. निर्णायक लष्करी कारवाईमुळे या प्रदेशातील इस्रायलचे शत्रू हिजबुल्लाह आणि इराण यांनादेखील रोखणं शक्य होईल.