नगर (प्रतिनिधी) – शासकिय रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले 14 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी (दि.17) जामखेड येथील एका रुग्णाला, तर शनिवारी (दि.16) पाथर्डी येथील करोनाबाधित व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता 42 झाली आहे.
सायंकाळी या प्रलंबित 14 व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. निगेटिव्ह आलेल्या अहवालात शेवगाव येथील एक, जामखेड दोन, संगमनेर-एक, राहाता-दोन, नगर शहर-पाच, अकोले-एक, राहुरी-एक आणि कोपरगाव येथील एका व्यक्तीच्या अहवालाचा त्यात समावेश आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाथर्डी येथील मोहोज देवढे येथील शेतकरी करोनाबाधित झाल्याचे आढळून आले होते. त्याच्यावर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने रुग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यानुसार बाधित व्यक्तीला दहा दिवसांत कोणताही त्रास होत नसेल, त्याची प्रकृती चांगली असेल, तर त्याला डिस्चार्ज देण्यात येऊन घरीच 14 दिवस क्वारंटाईन करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत एक हजार 832 व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून, त्यापैकी 1 हजार 730 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. करोनामुक्त झालेल्या 42 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या एकूण 17 जण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.