सातारा – येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या रंगरंगोटीचे काम सुरू झाले असून सोमवारी प्रस्तावित कामांची पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी पाहणी केली व ठेकेदाराला सूचना करुन काम तातडीने व दर्जेदारपणे करण्याचे आदेश दिले.
यावेळी कोल्हापूर येथील संग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे, छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजशिर्के, सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे व संदीप पोळ इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रारंभी तेजस गर्गे यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले तसेच शिवरायांच्या तख्ताची सुद्धा पाहणी केली. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीला झळाळी आली आहे. तसेच वेळोवेळी झालेल्या आंदोलनामुळे प्रशासनाने सुद्धा या इमारतीच्या पुढील कामाची दखल घेतली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 61 लाखाची पुढील कामे सुरू झाली आहेत.
यामध्ये दालनांचे प्रशस्तीकरण मजबुतीकरण, ऐतिहासिक वस्तूंची साजेशी मांडणी तसेच इतर सुविधा, दालनांची रंगरंगोटी इत्यादी कामांसाठी सध्या पहिल्या टप्प्यात 61 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या कामांची निविदा काढण्यात आली असून संबंधित ठेकेदारने काम सुरू केले आहे. या कामांच्या संदर्भात पाहणीनंतर गर्गे यांनी ठेकेदाराला सूचना देऊन हे काम तातडीने पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले. ही कामे तात्काळ आणि दर्जेदार पद्धतीने कशा स्वरूपात होतील याकडे लक्ष देण्यात यावे, अशा सूचनाही गर्गे यांनी यावेळी केल्या आहेत.