शिल्पा रसाळ-जोशी
नगर – पुणे मराठी वाचन मंदिराच्या वतीने राज्यातील सार्वजनिक वाचनालयांमध्ये दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत आत्तापर्यंत दुर्मिळ 5 हजार ग्रंथांच्या सात लाख पृष्ठांचे डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले असून या मौल्यवान उपक्रमात अहमदनगर जिल्हा वाचनालयातील शंभर ग्रंथाच्या डिजिटायझेशनची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता सर्वजनिक वाचनालयांमधील दुर्मिळ ग्रंथ ग्लोबल होत आहेत.
सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे विविध ग्रंथ सार्वजनिक वाचनालयांमध्ये आहेत. काही ग्रंथांची पृष्ठे काळाच्या ओघात पिवळी पडली असून जीर्ण झाल्याने ते ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देणे शक्य नाही. मात्र ज्ञानाचा हा ठेवा पुढच्या पिढीसाठी, अभ्यासक व संशोधकांसाठी उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने हा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती पुणे नगर वाचन मंदिराचे कार्यकारणी सदस्य अरविंद रानडे यांनी दिली. जिल्हा वाचनालय व पुणे नगरवाचन मंदिर या दोन संस्थांमध्ये दुर्मिळ ग्रंथ डिजिटायझेशनसाठी करार झाला. या मध्ये प्रत्येक जीर्ण पृष्ठाचे स्कॅनिंग करून ते जतन करण्याचा प्रयत्न केला जातो.
त्याची पीडीएफ फाईल तयार केली जाते. कथा, कादंबरी, नाटके, उपनिषदे, चरित्र गणेशोत्सव मेळ्यातील गाणी, समाजशास्त्र, गीतेवरील टीका, जून्या कविता आदी विविध दुर्मिळ ग्रंथांचे डीजिटायझेशन केले गेले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम सुरू असून आत्तापर्यंत 1 हजार पुस्तके अपलोड करण्यात आली. डिजिटायझेशन करण्यात आलेले सर्व ग्रंथ स्वामित्व अधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) आहेत. आत्तापर्यंत अहमदनगर जिल्हा वाचनालय, भोर येथील ग. पा. पंत सार्वजनिक वाचनालय, वाई येथील लोकमान्य टिळक ग्रंथालय, हैदराबाद येथील मराठी ग्रंथ संग्रहालय, पुण्यातील एसपी कॉलेजचे ग्रंथालय पुणे मराठी ग्रंथालय या ग्रंथालयांमधील विविध दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आल्याची माहिती पुणे नगर वाचन मंदिराच्या ग्रंथपाल सविता गोकुळे यांनी दिली.
दीडशे वर्षांपूर्वीची ग्रंथसंपदा
डिगजीटायझेशन करण्यात आलेल्या अहमदनगर जिल्हा वाचनालयातील ग्रंथांमध्ये सेनापती (प्रकाशन 1938) हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास(1909), श्री शुक्रनीती (1880), स्पानी मुरलोक (1893), मोगऱ्याची फुले (1917) आदी अति दुर्मिळ ग्रंथांचा समावेश असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा अध्यक्ष शिरीष मोडक व प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी दिली.