पुणे – वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना सर्व कागदपत्रे बाळगणे आवश्यक आहे. तर वाहतूक विभाग किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईवेळी कागदपत्रे दाखवणे गरजेचे असते. अनेकदा कागदपत्रे उपलब्ध नसल्यास वाहनचालकावर कारवाई होऊ शकते. यासह शासकीय कामावेळी देखील कागदपत्रांची आवश्यकता असते. मात्र कागदपत्रे गहाळ झाल्यास किंवा कागदपत्रे तातडीने उपलब्ध नसल्यास काय करावे असा प्रश्न नागरिकांसमोर असतो.
मात्र, या प्रश्नावर केंद्र सरकारने तोडगा काढला आहे. “डिजिटल इंडिया’ प्रकल्पांतर्गत “डिजी लॉकर’ या “ऍप’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या “ई-लॉकर’मुळे कधीही आणि कोठेही आपली महत्त्वाची कागदपत्रे आधारकार्ड क्रमांकाद्वारे मिळवता येणार आहे. “डिजी लॉकर’ या “डिजिटल लॉकर’मुळे कागदपत्रांच्या “सॉफ्ट कॉपी’ संग्रहित ठेवता येणार आहेत. तर एका “क्लिक’वर कागदपत्रे मोबाइलवर देखील उपलब्ध होऊ शकणार आहेत. त्याचबरोबर या प्रतींची “प्रिंट’ देखील काढता येणार आहे. “डिजी लॉकर’मधील कागदपत्रे गाह्य धरणार असल्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
‘डिजी लॉकर’चा फायदा
-नागरिक त्यांची कागदपत्रे केव्हाही आणि कोठेही पाहू शकतात.
-परवाना आणि प्रमाणपत्रे नागरिकांना ऍपवर उपलब्ध होणार आहेत.
-कागदपत्रे गहाळ होणे, फाटणे अथवा खराब होत नाहीत.
-प्रमाणपत्रांवर “डिजिटल’ स्वाक्षरी करता येते.
-“क्यूआर कोड’ असल्याने फसवणूक होण्याची शक्यता नसते.
अशी करता येतात कागदपत्रे “अपलोड’
“गुगल प्ले स्टोअर’द्वारे “डिजी लॉकर’ डाऊनलोड करता येते. हे ऍप “डाऊनलोड’ केल्यानंतर आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांकाद्वारे “लॉग इन’ करता येते. यानंतर “लिंक’ क्रमांकावर येणाऱ्या “ओटीपी’द्वारे “डिजिलॉकर’चे खाते सुरू होते. या खात्यावर नागरिकांना शासकीय कागदपत्रांसह “ऍप’ वरील लिंकवरून डाऊनलोड करता येणार आहे. “डिजिलॉकर’मध्ये “पीडीएफ’, “जेपीईजी’, “पीएनजी’ या माध्यमांमध्ये अपलोड करता येतात. वळसळश्रेलज्ञशी.र्सीें.ळप या संकेतस्थळावरूनही कागदपत्रे संग्रहित करता येऊ शकतात.