पारगाव शिंगवे – पारगाव (ता. आंबेगाव) येथे एका मोबाइल कंपनीने जमिनीखालून केबल नेण्यासाठी चर खोदण्याचे काम केले असून, यामुळे गावातील रस्त्यावर संपूर्ण चिखल-माती झाल्याने ग्रामस्थांना व
वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मोबाइल कंपनीने ज्या ठिकाणी मोबाइल टॉवर आहेत, त्या ठिकाणी नवीन केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूने जेसीबीच्या साहाय्याने चर खोदण्याचे काम सुरू केले आहे. या चरांमध्ये पावसाचे पाणी साचून सर्वत्र रस्त्यावर चिखल झाला आहे. नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे मुश्किल झाले आहे.
चारचाकी वाहने या चरामध्येरुतली जात आहेत. या परिसरात वाहने उलटून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे मुरुमाचा भरावा करून रोलिंग करणे आवश्यक आहे. कंपनीने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रांमपंचायत सदस्य किरण ढोबळे, सचिन देवडे यांनी केली आहे. तालुक्याच्या पूर्वभ ागातील अनेक गावांमध्ये या केबलमुळे रस्ते खराब झालेले असून, पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पारगाव ग्रांमपंचायतीच्या वतीने संबंधित केबल काम करणाऱ्या ठेकेदाराशी संपर्क साधून रस्त्याची दुरुस्ती तातडीने करून द्यावी अशी मागणी केली असून, रस्ता दुरुस्त करून देण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले आहे.
– बबनराव ढोबळे, सरपंच