शिक्रापूर पोलिसांनी पाठलाग करून ट्रक पकडला : चोरटे फरार
शिक्रापूर – पुणे-नगर महामार्गावर अनेक दिवसांपासून डिझेल चोरीच्या घटना घडत असून शिक्रापूर (ता. शिरूर) येथेही घडलेल्या प्रकाराचा उलगडा झाला आहे. डिझेल चोरी करून घेऊन जाणारा ट्रक शिक्रापूर पोलिसांनी पाठलाग करून पकडला; मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
शिक्रापूर येथील कासारीफाटा येथील एका पेट्रोल पंपामध्ये लावलेल्या ट्रकमधील डिझेल चोरीला गेल्याची घटना घडली होती. तसेच वाहनातील डिझेल चोरीला गेले त्या वाहन मालकाने पेट्रोल पंपातील सीसीटीव्ही फुटेल तपासले असता त्याला सीसीटीव्हीमध्ये ट्रकमधून आलेल्यांनी डिझेल चोरी केले असल्याचे निदर्शनास आले होते.
यावेळी ट्रकमालकाने सीसीटीव्हीचे रेकॉर्ड करून ठेवलेले होते. शनिवारी (दि. 8) रात्री शिक्रापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण भालेकर, सहायक निरीक्षक महेंद्र शिंदे, गोरक्ष भामगर, अमित देशमुख हे कोरेगाव भीमा जवळ गस्त घालत असताना त्यांना एक ट्रक वेगाने येत असताना दिसला. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रकचालक वेगाने ट्रक घेऊन पळून गेला. यावेळी पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला असता ट्रकमधील दोघेजण लोणीकंद हद्दीमध्ये ट्रक सोडून पळून गेले.
यावेळी पोलिसांनी ट्रकमध्ये पाहणी केली असता ट्रकमध्ये डिझेल चोरी करण्यासाठी ठेवलेल्या कॅन आढळून आल्या. त्यांनतर कासारी फाटा येथून ज्या व्यक्तीच्या ट्रकमधील डिझेल चोरीला गेले होते. ते त्या ट्रकचे मालक आदेश धायरकर यांनी जप्त केलेल्या ट्रकची पाहणी केली. आपल्याजवळील सीसीटीव्ही तपासले असता, डिझेल चोरी करून जाणारा ट्रक शिक्रापूर पोलिसांनी पकडला असल्याचे समोर आले. याबाबत आदेश अशोक धायरकर यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी करीत आहेत.