प्रचार दौऱ्यानिमित्त हर्षवर्धन पाटील यांची ग्वाही
रेडा- जातीवादी लोकांच्या अपप्रचाराला साथ देऊ नका. ज्या माणसाचे मार्ग संपतात ते जातीवादी आरोप करतात. इंदापूरच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या प्रचार दौऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या गाव बैठकीत केले.
इंदापूर विधानसभेचे महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी माळवाडी नंबर 2, सरडेवाडी, शहा, महादेव नगर, हिंगणगाव, कांदलगाव, तरटगाव, बाभूळगाव, भाटनिमगाव, बेडशिंग, गलांडवाडी नंबर एक या भागातील प्रचार दौऱ्यादरम्यान जनतेशी संवाद साधला. यावेळी अमोलराजे इंगळे, निलेश देवकर, भरत शहा, बाळासाहेब मोरे, मालोजी पाटील, भास्करदादा पाटील, रणजीत पाटील, विजय देवकर, अनंत ननवरे, युवराज भांगे उपस्थित होते. जनतेशी संवाद साधताना अनेक नागरिकांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी हर्षवर्धन पाटीलच सक्षम नेतृत्व असल्याचे मत व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सध्या देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. सरकारच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन इंदापूर तालुक्याचा विकास करणार. भविष्यात देखील महायुतीचे सरकार येणार आहे त्यामुळे सर्वाधिक योजना इंदापूर तालुक्यात राबविण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले. यावेळी आप्पासाहेब जगदाळे, विशाल बोंद्रे, ऍड. कृष्णाजी यादव, अशोक घोगरे, नानासाहेब शेंडे नितीन शिंदे, भास्कर गुरगुडे, वामन सरडे, ऋतुजा पाटील, विलास वाघमोडे यांची भाषणे झाली.