हडपसर – सगळ्या कार्यालयांमध्ये नागरी सनदेचे काटेकोर पालन होणे गरजेचे असून बघतो, करतो, विचारुन सांगतो अशी कारणे देऊ नका. कोणतीही कारणे देवून नागरिकांच्या कामाला चालढकल करु नका. पुणेकरांच्या हिताची जी-जी कामे आहेत, ती प्राधान्याने करावीत.
नागरिकांच्या हिताची कामे प्रलंबित राहता कामा नये, तसे झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कसे बाजूला केले जाईल हे समजणारही नाही. कामामध्ये कुचराई करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशी स्पष्ट ताकीदच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी स्वखर्चातून ससाणेनगर येथे उभारलेल्या १०६ फूट उंचीच्या ध्वजस्तंभाचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे पाटील यांच्यासह परिसरातील विविध पक्षाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक ,नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले की योगेश ससाणे यांनी एकशे सहा फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारून राष्ट्राभिमान उंचावण्याचे काम केले आहे. राष्ट्रध्वजाकडे पाहिल्यानंतर आजही प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलते.
दरम्यान हडपसरमध्ये ठिकठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी करत आणि जेसीबीच्या सहाय्याने मोठा हार घालत माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी ससाणे नगर येथे,तर माजी नगरसेवक आनंद आलकुंटे यांनी वैदूवाडी-रामटेकडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले.
योगेश ससाणे म्हणाले की ,हडपसरकरांच्या माथी मारलेला कचरा डेपो ,येथील कचरा प्रकल्प व पुण्यातील टाकाऊ प्रकल्प येथून हटवण्यात यावे किंवा येथे होऊच नये यासाठी वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले. ही आंदोलने करताना मला चेष्टेचा विषय केला गेला. मात्र, लोकांच्या हितासाठी कोणताही त्रास सहन करण्याची माझी तयारी आहे.
हडपसर ,ससाणेनगरचा अभिमान वाढावा यासाठी स्वखर्चातून १०६ फूट उंचीचा ध्वजस्तंभ येथे उभारण्यात आलेला आहे. दरम्यान हडपसरगाव पांढरेमळा या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी नगरसेवक मारुती तुपे, गणेश ढोरे, पप्पू रोकडे व पांढरेमळा वसाहतीतील नागरिक यांनी स्वागत केले.