उंब्रज, मसूरला कडकडीत बंद; कराडात सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी
कराड – राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर भाजप सरकारकडून द्वेषापोटी ईडी चौकशी लावण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ जिल्ह्यासह राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी आंदोलन, बंद पाळून या चौकशीचा निषेध नोंदविण्यात आला. कराड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सरकार विरोधी घोषणाबाजी करत या चौकशीचा निषेध केला.
येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, सामाजिक कार्यकर्ते नाना खामकर, माजी नगरसेवक गंगाधर जाधव, नगरसेवक वैभव हिंगमिरे, सागर जाधव, पराग रामुगडे, शिवाजी पवार, अनिल धोत्रे, पोपट साळुंखे, मोहम्मद आवटे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मोठा उठाव करण्यासाठी झंझावात निर्माण केला आहे. त्यांच्या सभांनाही अभूतपूर्व गर्दीसह तरुणांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजप सरकार हादरले असून पवार साहेबांना रोखण्यासाठी भाजपने ईडीचा कुटील डाव टाकला आहे. मात्र, त्यामुळे राज्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेत संतापाची लाट उसळली आहे. तसेच या चौकशीच्या विरोधात जिल्ह्यासह राज्यभरात दोन दिवसांपासून विविध ठिकाणी आंदोलन, बंद पाळण्यात येत आहे. त्यानुसार कराड येथे दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करत या चौकशीचा निषेध नोंदवला.
या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कराड बंदची हाक दिली होती. मात्र, कराड शहरामध्ये पूर परिस्थितीमुळे झालेले नुकसान व दरम्यानच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे शहराचे मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता कराड शहरावर पुन्हा बंद लादणे हिताचे ठरणार नाही. तशा सूचना पक्षनेतृत्वाकडून आल्याने कराड बंद तहकूब करण्याची भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. म्हणून राष्ट्रवादीकडून दत्त चौकात निषेध नोंदवला.
उंब्रज, दि. 27 (वार्ताहर) -माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव ईडीच्या आरोपपत्रात आल्याच्या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून उंब्रज मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पाठिंबा दर्शवित येथील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळत बंदमध्ये सहभागी झाल्याने उंब्रजसह परीसरात शुकशुकाट जाणवत होता.
उंब्रज, ता. कराड येथील बाजारपेठ येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या नजीक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एकत्रित जमा होऊन शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सुडबुध्दीने केलेली कारवाई ही सध्या पवार साहेबांच्या सभा, दौरे यांना मिळणारा उदंड प्रतिसाद व येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई केली आहे. हे सरकार सुडबुध्दीने वागत आहेत. असे म्हणत सरकार विरोधात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
उंब्रज बंद मधून मेडिकल, दवाखाने, शैक्षणिक संस्था, बॅंका, शासकीय कार्यालये या अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. याप्रसंगी जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, संपतराव जाधव, रामचंद्र जाधव, शिवाजीराव कुरकुटे, उपसरपंच पै. अजीत जाधव, पं. स. सदस्य सोमनाथ जाधव, डी. बी. जाधव, संग्रामसिंह पलंगे, राजेंद्र नागे, सरदारसिंह परदेशी, विलास नांगरे, सुधीर जाधव, विनायक जाधव, सुरेश कुंभार व इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.