हैदराबाद – लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांनी शनिवारी हैदराबादनजीक निदर्शने केली. घरवापसीची मागणी करत त्यांनी बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्या कंपनीकडून एका ठिकाणी बांधकाम सुरू आहे.
तिथे काही महिन्यांपासून अनेक स्थलांतरित मजूर काम करत होते. लॉकडाऊनमुळे ते काम थांबले आहे. आता संयम सुटलेल्या मजुरांकडून घरी जाण्यासाठी विशेष रेल्वेच्या व्यवस्थेची मागणी केली जात आहे. त्या मागणीसाठी ते आक्रमक झाले.
कंपनीच्या कार्यालयाबाहेर जमून त्यांनी व्यवस्थापनाविरोधात घोषणाबाजी केली. काही मजुरांनी कंपनीच्या कार्यालयाला लावण्यात आलेली काचेची तावदाने फोडली. त्यांना शांत करण्यासाठी स्थानिक पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.