वाघोली (प्रतिनिधी) – वाघोलीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या लोकसंख्येच्या विविध समस्या सोडवण्यासाठी जास्त निधी राज्य शासनाच्या वतीने देण्यात यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले की, वाघोली मध्ये पिण्याच्या पाण्याची योजना तसेच सांडपाण्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न गंभीर असून यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवून पिण्याच्या पाण्यासाठी भरीव निधी व सांडपाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी व कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रकल्प राबवण्याची गरज आहे.
उपमुख्यमंत्री यांच्याकडे राज्य मार्ग वाघोली ते लोहगाव यासाठी रुंदीकरण करून कॉंक्रिटीकरण करण्यावर जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा याशिवाय वाघोली ते केसनंद या राज्य मार्गावर देखील सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी निधीची मागणी दाभाडे यांनी केली.
वाघोली मधील केसनंद फाटा या ठिकाणी पंचक्रोशीतील रुग्णसेवेचा एक आदर्श म्हणून सिव्हिल हॉस्पिटल व ट्रामा सेंटर राज्य शासनाच्या वतीने उभारणी करावी अशी मागणी देखील दाभाडे यांनी केली आहे. यावेळी दौंड चे आमदार राहुल कुल, भाजप नेते प्रदीप कंद, संतोष देशमुख, बापूसाहेब कंद व इतर मान्यवर उपस्थित होते.
वाघोलीत फडणवीस यांच्या भेटीने उलट सुलट चर्चा…
वाघोलीच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामभाऊ दाभाडे यांच्या मागणीनुसार वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला होता. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर रामभाऊ दाभाडे यांचे ऋणानुबंधाचे संबंध असून या संबंधाचा फायदा वाघोलीच्या विकासासाठी व्हावा ही भावना ठेवून दाभाडे यांची देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भेट झाली आहे. मात्र दाभाडे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्याने वाघोलीत देवेंद्र फडणवीस व दाभाडे यांच्या भेटीमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.