नवी दिल्ली – देशभरातील करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना आरोग्य सुविधान मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे देशात लसीकरण मोहीत राबविण्यात येत आहे. जेणेकरून करोनावर नियंत्रण मिळवता येईल. मात्र लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही एका डॉक्टरचा करोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतील सरोज रुग्णालयातील डॉ. अनिल कुमार रावत असं मृत पावलेल्या डॉक्टरांचं नाव आहे. प्रकृती खालावल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं वय ५८ वर्षे होतं. विशेष म्हणजे मार्चमध्येच त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता. डॉ. रावत १९९६ पासून सरोज रुग्णालयात कार्यरत होते. १० ते १२ दिवसांपूर्वी अनिल कुमार रावत यांना करोनाची लागण झाली होती. मात्र शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळं त्यांना सरोज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
‘करोना लसीचे आपण दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे मी लवकरच करोनावर मात करेन’, असा विश्वास रावत यांना होता. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या सहकाऱ्यांकडे बोलूनही दाखवली होती. मात्र करोनाने अखेर त्यांचा अंत झाला. मार्च महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेतला होता.