नवी दिल्ली :- एका अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा बलात्कार करून तिला गर्भपाताची सक्ती केल्याचा आरोप असलेल्या दिल्ली सरकारच्या वादग्रस्त अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी जारी केला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे.
पोलिसांनी सांगितले की, दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या एका अधिकाऱ्याविरुद्ध त्याच्या मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार करून तिला गर्भपाताची सक्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांचे 1 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झाले आणि तेव्हापासून ती आरोपी आणि त्याच्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी राहत होती.
या अधिकाऱ्याने नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीच्या पत्नीने मुलीला गर्भधारणा संपवण्यासाठी औषध दिल्याचाही आरोप आहे. मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिने अधिकाऱ्याच्या पत्नीला सांगितले. त्यानंतर पत्नीने आपल्या मुलाला गर्भधारणा संपवण्यासाठी औषध आणण्यास सांगितले आणि ते मुलीला दिले.
ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा, आता बारावीत असलेल्या या मुलीने, हॉस्पिटलमधील एका समुपदेशकाला तिची आपबिती कथन केली. या वर्षी ऑगस्टमध्ये मानसिक त्रासानंतर तिला सेंट स्टीफन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. जानेवारी 2021 मध्ये पीडिता तिच्या आईकडे परतली.
आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, महिला कल्याण अधिकाऱ्याने घृणास्पद कृत्य केले आहे. त्याच्या पत्नीचाही या गुन्ह्यात सहभाग होता. समाजाला हादरवून सोडणारी ही घटना आहे. यावर लवकरात लवकर कारवाई व्हायला हवी होती. पण मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आता त्या अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांचा विलंब हा या प्रकरणाचा सर्वात वाईट भाग आहे. त्या अधिकाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.