नवी दिल्ली- अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या पाच नोटिसांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ईडीच्या तक्रारीवरून राऊस एव्हेन्यू न्यायालयाने आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बुधवारी समन्स बजावले असून १७ फेब्रुवारीला त्यांना चौकशी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
कथित दारू अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने पाठवलेल्या 5 समन्सला आप नेत्याने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. ईडीने अरविंद केजरीवाल यांना पाच वेळा चौकशीसाठी समन्स पाठवले होते. मात्र, ते हजर झाले नाहीत.
त्यानंतर तपास यंत्रणेने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आज सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
दरम्यान, केजरीवाल यांना ईडीने २ नोव्हेंबर २०२३ रोजी पहिले समन्स बजाविले होते. यानंतर दुसरे समन्स २१ डिसेंबर २०२३, तिसरे समन्स ३ जानेवारी २०२४, चौथे समन्स १८ जानेवारी २०२४ आणि पाचवे समन्स २ फेब्रुवारी २०२४ रोजी राजी केले होते. मात्र, केजरीवाल यांनी हे समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. ईडीला समन्स पाठवण्यापूर्वी सीबीआयने 16 एप्रिल 2023 रोजी केजरीवाल यांची चौकशीही केली होती.