नवी दिल्ली : दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईटचे पाटणा विमानतळावर आज सकाळी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हे लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकाराची माहिती देताना पाटणा विमानतळाच्या संचालकांनी सांगितले की, ‘दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 2433 मध्ये उड्डाण केल्यानंतर तीन मिनिटांनी त्याच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. याबाबतची माहिती विमानाच्या पायलटने दिला आणि इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. यानंतर उड्डाणानंतर लगेचच विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे.
दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे सकाळी 9 वाजून 11 मिनिटांनी सुरक्षित लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाले तरी विमानतळावरील सर्व कामकाज सुरळीत सुरु आहे. इमर्जन्सी लँडिंगमुळे प्रवाशांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली होती. मात्र,सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या विमानामध्ये एकूण 181 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच विमानातील तांत्रिक अडचण दूर झाल्याची माहिती देखील विमानतळावरील प्रशासनाने दिली आहे. परंतु हे विमान दिल्लीला पाठवता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी लखनौवरुन विमान मागवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच विमानाने या सर्व प्रवाशांना दिल्लीला जाता येणार आहे.