- अपर तहसीलदार गीता गायकवाड यांची कारवाई
- पोकलेन मशीन, दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर, वाळू चाळण जप्त
देहूगाव – तीर्थक्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणी नदीपात्रातील वसंत बंधाऱ्याजवळ वाळू उपसा करणाऱ्यावंर गुरुवारी (दि. 25) पहाटे चारच्या सुमारास पिंपरी-चिंचवडच्या अपर तहसीलदार गीता गायकवाड यांनी कारवाई केली. या कारवाईत एक पोकलेन मशीन, दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर व त्यावर वाळू चाळण्याच्या चाळणी असलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. वाळू उपसा करणारे अज्ञात इसम व वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी झाले . या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. निवासी नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, गणेश सोमवंशी, उन्मेश मुळे, अंकुश आटोळे, तलाठी अतुल गीते, पोलीस पाटील चंद्रसेन टिळेकर, सुभाष चव्हाण व कोतवाल संभाजी मुसुडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तीर्थक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदी परिसरात वाळू माफियांचे मोठे रॅकेट सुरू असून यामध्ये काही स्थानिकांचाही सहभाग असल्याने या सर्वांच्या मुसक्या आवळाव्यात अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. देहूगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून वाळू माफियांनी थैमान घातले होते. याबाबत काही नागरिकांनी अपर तहसीलदार गीता गायकवाड यांच्याकडे तक्रार केले होते. या तक्रारीची दखल घेत तहसीलदार गायकवाड यांनी महसूल विभागाच्या पथकासह गुरुवारी (दि. 25) पहाटे चारच्या सुमारास छापा घालत कारवाई केली आहे. या कारवाईत जप्त केलेली वाहने विना नंबर प्लेट आढळून आली. मात्र वाहनांवर चॅसी नंबर मिळाले आहेत.
देहूगाव येथील वसंत बंधाऱ्याजवळ गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात होता. या परिसरातील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे सहा दशकांपूर्वी कोल्हापूर पद्धतीचा वसंत बंधारा बांधण्यात आला होता. याच बंधाऱ्याजवळ वाळू उपसा होत असल्याने हा बंधारा ठीक ठिकाणी गळती होऊन धोकादायक बनला आहे. परिणामी या बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठविले न जाता पाणीगळतीच जास्त होते. यामुळे शेतीला पाणीपुरवठा करणे अवघड होत आहे. या ठिकाणी पाणीगळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने वसंत बंधाऱ्याच्या परिसरातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर वाळू माफियांकडून वाळू उपसा करणे सोपे होते. संपूर्ण इंद्रायणी नदी पात्रात अवैधरित्या होणाऱ्या वाळू उपसामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडवला जात असून बंधाराल्या मोठा धोका निर्माण करीत असल्याने कठोर कारवाई करणार असल्याची माहिती तहसीलदार गायकवाड यांनी दिली आहे.