मुंबई – कर्करुग्णांवर उपचार करणारे टाटा मेमोरियल रुग्णालय हे या क्षेत्रातील देशातील
सर्वात मोठे रुग्णालय आहे. याठिकाणी वर्षाला सुमारे 75 हजार नव्या रुग्णांवर उपचार केले
जातात तर वर्षभरात साडेचार लाख रुग्ण नंतरच्या उपचारांसाठी येऊन जातात. त्यामुळे
अनेकदा उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांची यादी मोठी असल्याने अनेकांना वाट पहात थांबावे
लागते.
त्यावर उपाय म्हणून मुंबईतील एका दानशूर महिलेने तिच्या मालकीची सुमारे 120 कोटी रुपये किंमतीच जमिन टाटा रुग्णालयाला केमोथेरपी केंद्र सुरू करण्यासाठी दिली आहे तर आणखी 18 दानशूर व्यक्तींनी त्याठिकाणी केंद्राच्या बांधकामासाठी एकत्रितपणे 18 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
नवे केमोथेरपी केंद्र झाल्यानंतर सध्या असलेल्या व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. सध्या रुग्णालयात केमोथेरपीसाठी 100 बेड असून रोज 500 रुग्णांना केमोथेरपी दिली जाते. असे असले तरी आजही रुग्णांना केमोथेरपीसाठी 30 दिवसांची वाट पहावी लागते.
मुंबईतील 61 वर्षांच्या दीपिका मुंडले यांनी त्यांची वडिलोपार्जित 30 हजार चौरस फुटाची
जागा टाटा रुग्णालयाला देणगी म्हणून दिली आहे. सध्याच्या टाटा रुग्णालयापासून ही जागा
फक्त 400 मीटर अंतरावर आहे. त्या त्यांच्या आत्यासमवेत अनेकदा टाटा रुग्णालयात
रक्तदानासाठी जात असत. त्यावेळी रुग्णालयातील व्यवस्थापनाचा सुरळीतपणे आणि वेगाने
काम करण्यासाठीची धांदल त्यांनी पाहिली होती.
त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मालकीची जमिन टाटा रुग्णालयाला मे 2018 मध्ये दान दिली. आता आणखी 18 दात्यांनी मिळून याठिकाणी इमारत बांधण्यासाठी 18 कोटी रुपयांचा निधी देणगी म्हणून दिला आहे. त्यांनी नावे न जाहीर करता अनामिक राहणे पसंत केले आहे. त्यांच्यावतीने परोपकार या धर्मादाय ट्रस्टने टाटा रुग्णालयाबरोबर बांधकामासाठीचा समजुतीचा करार केला आहे.
टाटा मेमोरियल रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांपैकी जवळपास 70 टक्के रुग्णांवर विनाशुल्क उपचार केले जातात. या ठिकाणी असणाऱ्या विविध विभागातील 700 खाटांसाठी कायम लांबलचक प्रतिक्षा यादी असते. देशाच्या विविध भागातून याठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात.
त्याचबरोबर पश्चिम आशियातील देशांतून तसेच अफ्रिका खंडातील अनेक देशांमधील रुग्णांनाही याठिकाणी उपचार हवे असतात. रुग्णालयातील वऱ्हांडे कायम रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी गजबजलेले असतात. कुणी अॅडमिट होण्याची वाट पहात असतात तर अनेकजण पाठपुराव्याच्या उपचारासाठी आलेले असतात.
इथला केमोथेरपी उपचार विभाग कायम व्यस्त असतो. मुंडले यांची आत्या याठिकणी असलेल्या रक्तपेढीमध्ये काम करत होत्या. त्यामुळे दीपिका मुंडले अनेकदा आत्याबरोबर रक्तदानासाठी याठिकाणी येत असत. त्या म्हणतात, गेल्या तीस वर्षात मी अनेकदा इथे आलेली आहे. त्यावेळी रुग्णालयाजवळील पदपथावर रुग्ण थांबलेले मी पाहिले आहेत.
त्यावेळी माझ्या मनात विचार यायचा यांना आपण मदत केली पाहिजे. माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आमच्या घराची जमिन या कामासाठी वापरता येईल आणि रुग्णांना काही प्रमाणात मदत होऊ शकेल असा विचार माझ्या मनात आला. आता ही जागा विकसित करण्याचे पूर्ण हक्क त्यांनी रुग्णालयाला दिले आहेत. त्यासाठी कुठल्याही अटी घातलेल्या नाहीत.
परोपकार ट्रस्टचे संस्थापक शंकर केजरीवाल म्हणतात, ज्या अठरा दात्यांनी या जागेवर
बांधकामासाठी 18 कोटी रुपये दिले आहेत त्यांच्यापैकी कुणाचाही याआधी ट्रस्टशी संबंध
नव्हता. आम्ही त्यांना रुग्णालयाच्या गरजांची माहिती दिली आणि त्यांनी देणगी देण्याचे मान्य
केले. नव्या केंद्रात केमोथेरपीसाठी 56 बेड असतील आणि रोज याठिकाणी 200 रुग्णांवर
केमोथेरपीचे उपचार करणे शक्य होणार आहे.
त्याचबरोबर याठिकाणी होणाऱ्या इमारतीत समुपदेशन दालने, केमोथेरपीनंतर लागणाऱ्या रिकव्हरी रुम्स आणि कौशल्य विकास प्रयोगशाळा असणार आहे. या प्रयोगशाळेतून डॉक्टरांना कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांचे प्रशिक्षण मिळणार आहे. दोन मजले डॉक्टरांच्या निवासस्थानांसाठी राखून ठेवण्यात येणार आहेत.