जगण्यासाठी जसं जसे जास्त पैसे लागू लागतात तशी तशी जीवनाची किंमत घसरू लागते. आजच्या शहरी जगण्यात याचा प्रत्यंतर पदोपदी येतोच. अशा वेळी ऐक ऐकलेली कहाणी आठवते. अर्थात कहाणीपेक्षा त्या मागील आशय महत्त्वाचा. ही गोष्ट अंदाजे अडीचशे वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येते.
फ्रान्समध्ये डेनिस डिडरोट नावाचा एक अभ्यासू वाचक होता. ग्रंथांबद्दल त्याचा भयंकर ओढा होता. त्याचा व्यासंगही दांडगा होता. त्याचे स्वत:चे असे मोठे ग्रंथालयही होते. त्याच्या या छंदामुळे त्याला स्वतःकरिता पैसे जोडता आले नाहीत. त्याचे उभे आयुष्य गरिबीत गेले. उपवर असलेल्या मुलींच्या लग्नासाठीसुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते.
या दरम्यान तेथील राणीला डिडरोटच्या ग्रंथप्रेम व त्याच्या गरिबीबद्दल कळाले.
त्याने डिडरोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी भली मोठी रक्कम देऊ केली. डेनिस डिडरोटने ते मान्य करत आपले ग्रंथालय राणीला विकून टाकले. मिळालेल्या पैशात त्याने राहण्यासाठी जुने घर घेतले.
तो उच्चभ्रू इलाखा असल्याने सभोवतालची वस्ती पाहता त्याला हे घेतलेले घर जुने असल्याचे वाटू लागले. त्याने मग घराच्या दर्शनी भागास रंग सफेदी केली, त्यामुळे घराचे बाह्यभाग चकाकू लागले; यामुळे आता त्याला घराची आतील भाग जुनाट वाटू लागला, मग त्याने त्याचेही नूतनीकरण करण्याचे काम हाती घेतले. घराच्या आत व बाहेरचे भाग दोन्हीही सुस्वरूप झाल्याने आता नव्या घराला साजेशी अशी बाग आंगणात असावी असे जाणवू लागले, मग त्याने बाग लावली.
आता या एकूण दिमाखाला शोभून दिसणारी बग्गी दाराशी असावी, असे वाटू लागले, त्यामुळे एक बग्गीही विकत आणली गेली. खर्चाची ही साखळी अशीच वाढत गेली आणि त्याची सारी संपत्ती संपण्याच्या मार्गावर आली. तो परत कफल्लक झाला. त्याचे जगणे कष्टमय झाले. आपल्याला रसातळात नेणाऱ्या या अनुभवांना डेनिस डिडरोटने एका निबंधात लिहून ठेवले. याला मानसशास्त्रात डिडरोट इफेक्ट (ऊळवशीीें एषषशलीं) असे म्हणतात.
“डिडरोट इफेक्ट’ म्हणजे एखादी वस्तू घेताना तिच्याशी संबंधित दुसरी वस्तू घेण्याची गरज आपसूकच निर्माण होते. एका वस्तूमुळे दुसऱ्या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे, हे ते “डिडरोट इफेक्ट’.
उदाहरणार्थ, शर्ट नवा घेतला की पॅंट जुनी वाटू लागते, मग पॅंट नवी घेतली जाते, आता या दोन्हीपुढे शूज जुने दिसू लागतात, बरं हे तिन्ही नवे चढवले की बेल्ट जीर्ण वाटू लागते. नवे मोबाइल घेतले की कव्हर जुने वाटू लागते. इयर फोन आवडेनासे होतात, मग नव्या मोबाइलसाठी या गोष्टीही नव्याने खरेदी केल्या जातात.
असे अनुभव वरच्यावर आपल्याला येत असतात. थोडक्यात सांगायचे, तर एक नवीन वस्तू विकत घेतली की; तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपल्या नजरेत आपोआपच कमी होतो आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो. खरं तर हा इतका मोठा विषय नसावाही, पण ही वृत्ती अंगवळणी पडू नये म्हणून दक्ष राहणे गरजेचे आहे; कारण हा इफेक्ट विस्तृत होत बाह्य जगतात इतरांशी अन्य तुलना करण्याचा मार्ग जोडू शकतो, त्यामुळे या चक्रव्यूहात न गुरफटलेलेच बरे.
या मोहातून स्वतःला दूर ठेवणे इष्ट. अन्यथा अजाणतेपणे आपले खर्च वाढू लागतात. खर्चाचे मेळ बसविणे अवघड होऊन बसते. परिणामी जगण्याच्या आनंदातून आपण पारखे होत जातो. तेव्हा जगण्यातली सहजता जपण्यासाठी अशा प्रभावातून मुक्त राहणे श्रेयस्कर. हे सूत्र घरात शांती आणि कमावत्या व्यक्तीला दीर्घकाळासाठी समाधानी ठेवण्यास उपयुक्त ठरेल.
-सत्येंद्र राठी