शनिशिंगणापूर – शनैश्वर देवस्थानची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, पानसनाला सुशोभीकरण प्रकल्पातील दीपस्तंभावर गोल्ड प्लेटिंगचा कलश बसवण्याच्या कामासाठी गोवा येथील कारागिराने ऍडव्हान्स रक्कम घेऊन काम करण्यासाठी टाळाटाळ केल्याने देवस्थानतर्फे शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गोवा येथील एका कारागिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील सर्वाधिक उंचीचा नवग्रह दीपस्तंभाचे काम पूर्ण झाले असून, त्यावर सहा फूट उंच व 80 किलो वजनाचा कलश ठेवण्यात येणार होता. हे काम गोवा येथील कारागीर जगदीश भट (रा. पलवाडा उसगावपौडा, गोवा) यास मिळाले होते.
कामास सुरुवात केल्यानंतर अनामतपोटी त्याच्या खात्यावर 4 लाख 28 हजार रुपये वर्ग करण्यात आले. परंतु पुढील काम करण्यास भट याने टाळाटाळ केली.
देवस्थानने वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्यास प्रतिसाद दिला नाही. देवस्थानचे कर्मचारी योगेश वाबळे यांच्या फिर्यादीवरून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात भट विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.