ढेबेवाडी – मुंबईतून बनपुरी, ता. पाटण येथे आलेल्या 43 वर्षीय महिलेला गावातील शाळेत क्वांरटाइन करण्यात आले होते. तिला रविवारी (दि. 17) अचानक त्रास झाल्याने कराडला रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसले तरी ती क्वारंटाइन असल्याने तिच्या घशातील स्रावाचे नमुने करोना चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या भागात करोनाचा शिरकाव झाला आहे का, या भीतीने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ढेबेवाडी व तळमावले येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या महिलेवर कराड येथे कोव्हिड रुग्णांसाठी असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बनपुरी येथे शनिवारी (दि. 16) मुंबईतून ही महिला बनपुरीत आली होती. ग्रामस्थांनी तिला गावातील शाळेत ठेवले होते. तिला काल (दि. 17) अचानक त्रास जाणवू लागल्याने कराडला हलवण्यात येत होते; परंतु तिचा वाटेतच मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह गावात आणण्यात आला. मृत्यूचे कारण समजले नसल्याने सरपंच शिवाजी पवार यांनी पाटणच्या गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर मृतदेह कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. तेथे तिच्या घशातील स्त्रावाचे नमुने करोना चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती सरपंचांनी दिली. या घटनेमुळे ढेबेवाडी भागात भीतीचे वातावरण आहे.
मुंबईतून ढेबेवाडी भागात येणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी जबाबदारीने वागले पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याभागात आतापर्यंत एकही संशयित सापडलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने बाजारपेठ काही नियम व अटींवर सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती; परंतु या घटनेनंतर बाजारपेठ पुन्हा काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी कराड पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कराड येथे नगरपालिकेने तयार केलेल्या कोव्हिड स्मशानभूमीत या महिलेवर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पालिकेच्या आरोग्य विभागाचे रफीक भालदार व मिलिंद शिंदे उपस्थित होते.