पूर्व हवेलीत मृत्यूचे प्रमाण वाढले : बाधितांवर उपचारासाठी हेळसांड
थेऊर- येथील करोना बाधित महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. त्या महिलेच्या 19 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ती नोकरी करत असलेल्या कंपनीमध्ये तिच्या संपर्कात आलेल्या महिला कामगारांची यादी करण्याचे काम सुरू आहे. रुग्णाच्या संपर्कातील एकूण 23 जणांना क्वारंटाइन करीत त्यांची चाचणी करत असल्याची माहिती कुंजीरवाडीचे वैद्यकीय अधिकारी मेहबूब लुकडे यांनी दिली.
मृत महिलेचा चाचणी अहवाल येईपर्यंत लोणी काळभोर व मांजरी शेवाळवाडी परिसरातील रुग्णालयाने दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने संबंधित महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. संबधित महिला थेऊर व कुंजीरवाडी परिसरात उपचार घेत होती. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला डॉक्टरांनी चाचणी करावयास सांगितली.
(दि.28) चाचणी केली. परंतु तिचा रिपोर्ट (दि.29) सायंकाळी उशिरा येणार होता. मात्र, महिलेला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी झाल्याने महिलेला अस्वस्थ वाटू लागले. त्यातच अहवाल येईपर्यंत तिला दाखल करून घेणार नसल्याची भूमिका रुग्णालयाने घेतल्याने तिची हेळसांड झाली. त्यानंतरच तासाभरात महिलेचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
तारमळा येथे राहणारे कुंटुबीय नुकतेच थेऊरमधील अलीफनगर येथे राहण्यास गेले होते.
- नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. नियमितपणे मास्कचा वापर करावा. मृत महिलेच्या कुटुंबांतील एकाचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून संपर्कातील 23 जणांना क्वारंटाइन केले आहे.
– मेहबूब लुकडे, वैद्यकीय अधिकारी, कुंजीरवाडी.