वरवंड (ता.दौंड) – येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ए. बी.अकलूजकर सराफ हे सराफाचे दुकान फोडून चोरट्यांनी ७७ लाख १० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर लोखंडी ग्रील कटरच्या साह्याने तोडून, आतील लोखंडी तिजोरी फोडून त्यातील सोने, चांदीच्या वस्तू व दागिने चोरून नेल्याचे उघड झाले आहे.
जवळपास रोख रक्कम दीड लाख रुपये, ४१ लाख २३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ३ लाख ५० हजार किमतीचे दुरुस्तीचे सोन्याचे दागिने, ३० लाख रुपये किमतीची ५० किलो चांदी, ७७ हजार रुपयांचे चांदीचे मोडीचे दागिने व १० हजार रुपयांची सीसीटीव्ही कॅमेरा मशीन असा एकूण ७७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी पोलीस कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी गाव घेतली. तसेच बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी पोलिसांनी स्थानिक दुकानदारांशी चर्चा करून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या चोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विशेष शाखेचे पथक व यवत पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तैनात करण्यात आले आहेत. लवकरच या अज्ञात चोरांना जेरबंद केले जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.