अतिशय मनमोहक असलेली गुंडाचा गणपतीची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. कसब्यातील हे देवस्थान अतिशय जागृत समजले जाते. ही मूर्ती पाहिल्यानंतर शिवशंकराने पार्वतीच्या हट्टाखातर मुलाला हत्तीचे शीर बसवून जिवंत केल्याची गोष्ट आठवल्याशिवाय राहतच नाही. हत्तीची गंडस्थळे, मोठे कान, अशी ऐसपैस ही मूर्ती आहे. सुमारे चार ते पाच फूट हिची उंची असून, ती संपूर्णपणे दगडातील आहे.
याची बैठकही दगडीच आहे. याला शेंदूर लावण्यात येतो. चतुर्भुज स्वरूपातील ही मूर्ती दोन्ही पाय खाली सोडून बसली आहे. डाव्या हातात मोदक आणि इतर हातांत आयुधे आहेत. सध्याची मूर्ती तशी अलीकडीलच 70 च्या दशकातील आहे. 1975 मध्ये देशपांडे यांनी ती घडवली आहे. त्या आधीची मूर्तीदेखील या मंदिरात पाहायला मिळते. पेशवेकाळात नागोजी गुंड यांच्या घराजवळ हा गणपती होता. त्यावरून याला गुंडाचा गणपती, असे नाव पडले असावे. जुन्या मूर्तीच्या अंगावरील शेंदुरी लेपन पडले आणि त्याच्या आत सर्वांगसुंदर परंतु भंगलेल्या मूर्तीचे दर्शन झाले.
जुनी मूर्ती पिंपळाच्या पारावर असलेल्या सहाबाय चारच्या कोनाड्यात ठेवण्यात आले होती. तिला कै. गोपाळ व्यवहारे जोशी यांनी स्वत: आणि वर्गणी गोळा करून मंदिराचा भाग वाढवला. सरदार फुलंब्रीकर यांच्या आजोबांनी दिलेल्या देणगीतून 1892 मध्ये याचा दगडी गाभारा बांधण्यात आला. हा गणपती नवसाला पावतो, असे समजले जाते. त्यामुळे या गणपतीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. हा इच्छित वरदान देतो अशी भक्तांची धारणा आहे.