औंध – काही समाजकंटकांनी वृक्षतोड करत अनेक झाडांचे खोड पोखरून त्यात केमिकल टाकून ती झाडे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा अमानवी प्रकार समोर आला आहे. तर, एक झाड पूर्णपणे कापण्यात आले आहे. चार ते पाच झाडांच्या बुंध्याजवळ
पोखरून रसायन टाकण्यात आले आहे. ही घटना बाणेर रस्त्यावरील राजयोग सोसायटीजवळ उघडकीस आली आहे.
दरम्यान, या ठिकाणी झाडांच्या फांद्या यापूर्वीदेखील मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्या आहेत. पालिकेतर्फे या समाजकंटकांवर कडक कारवाई केली जात नाही. त्यामुळे परिसरात अशा घटना वारंवार घडत आहेत.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, “या झाडांमुळे परिसरात कोणताही अडथळा निर्माण होत नाही. परंतु, शेजारीच असलेल्या जाहिरातीच्या होर्डिंगच्या आड ही झाडे येत असल्यामुळे होर्डिंग मालकानेच ही झाडे तोडली आहेत. याआधी देखील या परिसरामध्ये अशाच प्रकारे झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारे वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे “या होर्डिंग मालकावर कडक कारवाई करावी.’
वृक्षतोडीच्या ठिकाणी प्राथमिक पाहणी केली आहे. यापूर्वी वृक्षतोड करणाऱ्या सोसायटीस व होर्डिंग मालकास नोटीस बजावली होती. होर्डिंगला अडथळा येत असल्यामुळेच ही झाडे तोडण्यात आली असावीत, असे निदर्शनास येत आहे. या वृक्षतोड करणाऱ्यास नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– संदीप खलाटे, सहायक आयुक्त, मनपा
एकीकडे पुरस्कार, दुसरीकडे दुष्कृत्य
बाणेर परिसरामध्ये “वसुंधरा अभियान’सारख्या संस्था वृक्ष लागवड करतात. तर, दुसरीकडे अशाप्रकारे व्यावसायिक अंधाराचा फायदा घेत झाडे तोडत आहेत. अशा अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील वृक्षप्रेमी नागरिकांनी केली.