आळंदी – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव निमित्ताने दहीहंडीचा उत्सव संगीत – वाद्यांच्या आवाजात तसेच वरुणराजाच्या हलक्या सरीत चिमुकल्या बालगोपाळांच्या उपस्थितीत फुलांची उधळण करत मोठ्या जोमाने संपन्न झाला. यानिमित्ताने फुलांच्या हारांनी माऊली बागेची सजावट करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, विश्वस्त प्रकाश काळे, समवेत सोपान काळे, श्रीधर सरनाईक, सांस्कृतिक समिती प्रमुख योगेश मठपती, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे आदी उपस्थित होते. अजित वडगावकर व प्रकाश काळे यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व त्यामुळे त्यांच्यात नकळत सामाजिक एकता, सर्व धर्म समभाव सारख्या अनेक संस्कार मूल्यांचा विकास होतो, असे सांगितले. तसेच श्रीकृष्ण जन्मोत्सव व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव हे एकच नक्षत्र असल्याने श्रीकृष्ण जन्मोत्सवा बरोबर श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सुद्धा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले व सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी चिमुकल्या बालगोपाळांनी श्री कृष्ण व राधा यांच्या वेशभूषेत दोन ते तीन थर चढवून दहीहंडी फोडण्याचा आनंद नृत्यातून व्यक्त केला. व शेवटी मुलांना गोपाळकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप काळे यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली शेळके यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन प्रतिमा भालेराव यांनी केले व त्यास सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.