नवी दिल्ली – राजस्थानात पुन्हा जर कॉंग्रेसचे सरकार आले तर राज्यातील 1 कोटी पाच लाख कुटुंबांना गॅस सिलिंडर केवळ पाचशे रूपयांत दिली जाईल तसेच प्रत्येक कुटुंबातील महिला प्रमुखाला वर्षाकाठी 10 हजार रूपये दिले जातील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते अशोक गेहलोत (Shok gehlot) यांनी केली.
कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी (priyanka Gandhi) यांच्या उपस्थितीत झुंझनूच्या अरडावता येथील प्रचारसभेत बोलताना गेहलोत म्हणाले, आमचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर पाचशे रूपयांत सिलिंडर दिले जाईल आणि महिला कुटुंबप्रमुखाला सन्मान निधी दिला जाईल. गृहलक्ष्मी हमी योजनेच्या माध्यमातून महिलांना हफ्त्याने दहा हजार रूपयांची रक्कम दिली जाईल.
दरम्यान, प्रियंका यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यात किशनगढ येथून भाजपच्या तिकिटावर लढलेल्या विकास चौधरी यांचाही समावेश होता. राजस्थान विधानसभेच्या 200 जागांसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
यंदाही भाजप आणि कॉंग्रेस (bjp vs Congress) या दोनच पक्षांमध्ये लढत असून भाजप अंतर्गत कलहाने काहीसा अडचणीत आला असल्याचे भासते आहे. कॉंग्रेसमध्येही सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोन गटांमध्ये संघर्ष होता. मात्र तूर्त हा संघर्ष सोपवण्यात कॉंग्रेसला यश आल्याचे दिसते आहे.