कर्जत : गेल्या काही दिवसांपासून कर्जतमधील अनेकांच्या मोबाईलवर “तुमच्या खात्यावर काही ठराविक रक्कम पाठवली आहे, ती मिळवण्यासाठी सोबतची लिंक डाऊनलोड करा आणि पैसे मिळवा’, अशा प्रकारचे मेसेज येत आहेत. मात्र ही एक फसवणूक असून, ही लिंक डाऊनलोड करू नये. लिंक डाऊनलोड केली, तर त्या व्यक्तीच्या खात्यावरील पैसे परस्पर काढून फसवणूक होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी असा मेसेज आला तरी त्याची लिंक ओपन करू नये, सायबर विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दिवसेंदिवस सायबर क्राईममध्ये भर पडत आहे. यामध्ये मोबाईलवर आपल्या खात्यावर पैसे आलेले आहेत. आपण सोबतची दिलेली लिंक डाऊनलोड करा, असे सांगितले जाते. सर्वसामान्य माणूस अचानक पैसे आल्याचा मेसेज पाहून मोहात पडतो. उत्कंठेपोटी पाठविलेली लिंक उघडतो.
मात्र या लिंकद्वारे आपली गोपनीय माहिती समोरच्या व्यक्तीला मिळते आणि ती व्यक्ती परस्पर सहजपणे ऑनलाइन आपल्या बॅंक खात्यातील पैसे काढून घेते. जेव्हा आपल्याला हे कळते की, आपण फसवले गेलोय तोपर्यंत फार उशिरा झालेला असतो आणि आपण जरी आपल्याला ज्या मोबाईलवरून मेसेज आला होता, त्या क्रमांकाला उलटा फोन केला तरी तो लागत नाही, अशा प्रकारे फसवणूक होत आहे.
फसवणुकीपासून सावध रहा…
हल्ली मी अमूक एका बॅंकेतून बोलतोय तुमचं डेबिट कार्ड ऍक्टिव्हेट करायचे आहे. तुमचा ओटीपी सांगा असे खोटे सांगून बॅंक खात्यातील पैसे ऑनलाइन बॅंकिंगद्वारे काढून घेतले जात आहेत. तरी या अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे. कर्जतमध्ये असे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत.