पुणे: लॉंकडाऊनमुळे बँकांचे तीन हप्ते भरण्यास सवलत देण्यात आली आहे. याचा फायदा सायबर हॅकर्सकडून घेण्यात येत आहे. बँकेच्या नावाने बनावट मेसेज ग्राहकांना येत असून त्याद्वारे आपली बँक अकाऊंट माहिती मिळवण्यासाठी हॅकर्स कडून प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे ग्राहकांकडे पासवर्ड तसेच ओटीपी क्रमांकाची मागणी केली जात आहे. यापासून फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी सावधान राहण्याची गरज आहे.
सध्या सायबर पोलिसांकडून प्रभावीपणे नागरिकांना ऑनलाइन बँकिंग फ्रॉडला बळी पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हाट्स अप हॅकर्सचे प्रमाण वाढले असल्याने व्हाट्स अप वापरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता ती परिस्थिती नियंत्रणात आल्या नंतर बँकिंग विषयी काही प्रश्न समोर आहेत. विशेषतः तुमच्या गाडीचा हफ्ता राहिला असून आपल्या अकौंटचे डिटेल्स देण्यास हॅकर्सकडून सांगण्यात येते. त्यानंतर मोबाईलवर एक मेसेज पाठवून ओटीपी ची मागणी करण्यात येते.
अशाप्रकारे फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. खासकरून यात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. लॉकडाऊन मध्ये ऑनलाइन बँकिंगचा आकडा तुलनेने कमी असला तरी देखील हफ्ता भरण्याच्या नावाखाली फसवणूक सुरू आहे. विशेष म्हणजे बँक अशी माहिती मागवत नाही, हे अनेकांना माहित आहे. मात्र, करोनामुळे घबराट झाल्यामुळे आणि नवीन काहीतरी दिसत आहे, ते पाहण्याच्या नावावर नागरिक अशा गोष्टीना बळी पडत आहेत.
याविषयी पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ऍड. एस. बी. खामकर म्हणाले,
बँकेकडून कोणतीही लिंक पाठवण्यात येत नाही. पासवर्ड ओटीपी क्रमांक मागवण्यात येत नाही.ग्राहकांच्या खात्याची कोणतीही गोपनीय माहिती मागवली जात नाही. तीन महिने हप्ता न भरण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी बँकेत जावे लागत नाही. तुम्हाला जर या सुविधेचा लाभ घ्यायचा नसेल तर रजिस्टर ई-मेल वरून तसे मेल करावे या साठी काही राष्ट्रीयकृत बॕंकानी त्यांचे ग्राहकांना मेसेज द्वारे सुचविले आहे.
तुमच्या क्रेडिट, डेबिट कार्डचा क्रमांक बँक विचारत नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर काही बँका पर्सनल लोन देत आहेत. याचा वापर करून काही चोरटे मॅसेज करत आहेत. नागरिकानीं सावध रहावे. कुठलीही शंका असल्यास बँकेच्या हेल्पलाईनवर फोन करा. संबंधित अधिकारी व्यक्तीशी संपर्क साधा. बँकेची अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेणे महत्वाचे आहे. मात्र कुठल्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका.