बीजिंग – चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक झाला असल्याचे तेथून आलेल्या बातम्यांवरून स्पष्ट होते आहे. कोविडचा नवा व्हेरियंट जेएन.१ चा प्रकोप येथेही पाहायला मिळतो आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
डेली स्टारने दिलेल्या बातमीनुसार कोविडच्या या नव्या व्हेरियंटमुळे चीनमधील मृतांची संख्या वाढत चालली आहे.
स्मशानभूमीवर पुन्हा गर्दीचे दृश्य पाहायला मिळते आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही नव्या व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट या श्रेणीत ठेवले आहे. जगातल्या अनेक देशांमधून जेएन. १ ची माहिती आली असून हा विषाणू वेगाने पसरतो आहे असे त्यांनी म्हटले आहे.
डेली स्टारच्या बातमीनुसार चीनच्या हेनान प्रांतात स्थिती भयंकर झाली आहे. त्यांनी केलेल्या दाव्यांनुसार स्मशानभूमीत झालेली गर्दी पाहता तेथे २४ तास अंत्यसंस्कार सुरू आहेत. तसेच अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत असलेले मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आहेत.
भारताच्या संदर्भात बोलायचे झाले तर नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोविड टास्क फोर्सचे सह अध्यक्ष राजीव जयदेवन म्हणाले की, जसा अनुमान होता तसे काही जणांच्या मृत्यूच्या बातम्या आल्या आहेत. मात्र बहुतांश प्रकरणात कोविड झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत नसल्याचे आढळून आले आहे.
चीनचे सरकार म्हणते करोना नाही
चीनमधील माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार हा न्यूमोनियाचा प्रकोप आहे. मात्र त्यामुळे करोनाच्या कटू आठवणी त्यामुळे जाग्या झाल्या आहेत. न्यूमोनियामुळे रूग्णांची सख्या सप्टेंबरपासूनच वाढली आहे. लहान मुलांना विशेषत: चटकन याचा प्रादुर्भाव होतो आहे.
एन्फ्लूएन्झा, मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया, सिंकिटियल व्हायरस, राइनोव्हायरस यामुळे चीनमधील स्थिती बिघडल्याचे म्हटले जाते आहे. मात्र हा करोना असल्याचा चीन सरकारकडून इन्कार केला जातो आहे. तथापि, तेथील नागरिक मात्र हा करोनाचाच प्रकार असल्याचा दावा करत आहेत त्याची कारणे आताच्या रूग्णांची आणि तेंव्हाच्या करोना रूग्णांची लक्षणे सारखीच आहेत. अगोदर रूग्णाला ताप येतो आणि त्यानंतर प्रचंड सर्दी होते व लगेचच त्याची प्रकृती एकदमच ढासळते.