आळंदी – तुम्ही आतापर्यंत चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलाने कविता पाठ केल्याचे पाहिले असेल, प्रार्थना पाठ केल्याचे पाहिले असेल मात्र तीर्थक्षेत्र आळंदीत राहणाऱ्या 9 वर्षीय सोहमने ज्ञानेश्वरीतील 9 हजार ओव्या आणि भगवद्गीतेतील 700 श्लोक म्हणजेच संपूर्ण ज्ञानेश्वरी आणि संपूर्ण गीता मुखपाठ केली आहे. सोहम हा आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच इयत्ता चौथीच्या वर्गात शिकतो.
सोहमचे वडील पुंजाराम अमझरे मुळचे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील आहेत. 15 वर्षांपूर्वी ते वारकरी भजन, कीर्तनात वाजविले जाणारे वाद्य मृदंग वाजविण्याचे शिक्षण घेण्यासाठी आळंदीला आले. काही वर्ष मृदंगाचे शिक्षण घेऊन संसार चालविण्यासाठी व्यवसाय म्हणून वारकरी गळ्यात घालतात त्या तुळशीच्या माळा बनविण्याची कला शिकली. तुळशीमाळा विकून ते संसार चालवितात. पुंजाराम सांगतात की, आजोबा वारकरी असल्यामुळे घरी धार्मिक वातावरण होते. सोहमकडून ज्ञानेश्वरी पाठांतर करुन घेण्याची आमची इच्छा होती. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न सुरु केले. सकाळी दोन तास सायंकाळी दोन तास असे दररोज चार तास सलग 4 वर्ष त्याच्याकडून पाठांतर करुन घेतले. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन त्याने ज्ञानेश्वरीचीच साधना करावी अशी आमची इच्छा आहे.
सोहमची आई सीमा अमझरे सांगतात की, त्या श्रीकृष्णाच्या भक्त आहेत. गर्भातच मुलांवर संस्कार होतात यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे सोहम गर्भात असतानाच सीमा यांनी ज्ञानेश्वरीची 108 पारायणे केली. सोहम 4 वर्षांचा झाला तेंव्हापासून त्याचे वडिल पुढे म्हणत आणि सोहम त्यांच्या मागे ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणायचा. त्यावेळी त्याचे स्पष्ट उच्चारही येत नव्हते. तो शाळेत गेल्यानंतर त्याला लिहिता वाचता येऊ लागले त्यानंतर आम्ही त्याच्याकडून ओव्या पाठांतर करून घेतले.
सोहमचे मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक प्रदीप काळे सांगतात की, शाळेतील अभ्यासात तो कधीच कमी पडला नाही. तो नेहमी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होतो. संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ करणे ही खुप मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत एवढ्या कमी वयात कोणी ज्ञानेश्वरी पाठ केल्याचे मी पाहिले नाही. सोहमच्या या कामगिरीचा आम्हा सर्व शिक्षकांना आणि शाळेला अभिमान आहे.
मंडळी सोहमच्या या ज्ञानेश्वरी पाठांतराचे मोठे कौतुक होत आहे. त्याच्या ज्ञानेश्वरी आणि गीता पाठांतराची आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेत परीक्षा घेण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी द्वारा आयोजित केलेल्या प्रस्थानत्रयी पारायण या कार्यक्रमातही सोहमची परीक्षा घेण्यात आली. वारकरी शिक्षण संस्थेचे कुऱ्हेकर बाबा, रामभाऊ महाराज राऊत, चैतन्य महाराज देगलुरकर, डाॅ. नारायण महाराज अशा विद्वान मंडळींनी सोहमच्या पाठांतराचे कौतुक केले आहे.