पिंपरी, दि. 15 (प्रतिनिधी) – दिवाळीच्या खरेदीसाठी बाजार सजले आहेत. अवघ्या आठवडाभरावर आलेल्या सणानिमित्त खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. मात्र या खरेदीत आपण ज्या वस्तू खरेदी करत आहोत त्या बनावट नाहीत, याची खात्री करणे आवश्यक आहे. डुप्लिकेट वस्तू, उत्पादनांना ब्रॅंडेड वस्तू, उत्पादनांचा लोगो चिकटवून त्या ग्राहकांच्या माथी मारल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. दिवाळीची खरेदी करताना ब्रॅण्डेडच्या नावाखाली खपवलेल्या डुप्लिकेट वस्तू घरी जाणार नाहीत, याची नागरिकांनी काळजी घ्यायला हवी.
सध्या दिवाळीच्या खरेदीची धमाल सुरू आहे. खाद्य पदार्थांसह मोबाइल फोन, घड्याळे, जीन्स पॅन्ट, कपडे, बूट अशा दररोजच्या वस्तूंची सर्रास खरेदी केली जाते. दुकाने तुडुंब भरली आहेत. दुकानदार जो माल देईल तो त्याच कंपनीचा आहे, असे समजून तो ग्राहक खरेदी करतात. परंतु खूप मोठ्या प्रमाणावर ब्रांडेड वस्तुंचा लोगो वापरून बनावट उत्पादनांची विक्री होत आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी काही नामांकित कंपन्या गुणवत्तापूर्ण उत्पादन करता त. त्यामुळे ग्राहकांकडून त्याला मोठी मागणी असते. याचाच गैरफायदा घेत काही दुकानदार बनावट किंवा दर्जा नसलेल्या वस्तू संबंधित नामांकित कंपनीच्या नावाने विक्री केल्या जातात. सामान्य ग्राहकांना ते ओळखणे सहज शक्य होत नाही. यातून ग्राहकांची फसवणूक होते.
असा आहे स्वामित्व कायदा
बौद्धिक संपदेचा अधिकार म्हणजे स्वामित्त कायदा होय. लेखकाच्या किंवा निर्मात्याच्या त्यांनी निर्माण केलेल्या मूळ कार्यांचे संरक्षण करणे म्हणजे कॉपीराइट कायदा. स्वत: तयार केलेल्या गोष्टींवर त्या तयार करणाऱ्यास या कायद्यानुसार मालकी हक्क मिळतो. या कायद्यात सर्वकाही येऊ शकते. कलाकृती, कविता, कादंबरी, पेंटिंग, चित्रपट, व्हिडिओ, संगीत, गाणी, म्युझिक रेकॉर्डिंग, संगणक प्रणाल्या, पुस्तके, वेबसाइट्स, यासह ज्याची स्वत: कोणी निर्मिती केली आहे अशा सर्व बाबींचा यात समावेश होतो. यात एक व्यक्ती, संस्था, संघटना, कंपनी, आस्थापना यांचा समावेश असू शकतो. एखाद्या वस्तूची, गोष्टीची मालकी त्यांच्याकडे असू शकते. या मालकीचे संरक्षण कायदेशीर करणे म्हणजेच कॉपीराईट कायदा होय.
झेरॉक्स काढून बौद्धिक संपदेची चोरी
लेखक, साहित्यिक यांच्या कविता, कादंबरी, पुस्तके यांच्या साहित्यकृती किंवा पुस्तकाच्या झेरॉक्स काढून त्याची विक्री केल्याचा प्रकार पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथे उघडकीस आला होता. कॉपीराइटप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. प्रकाशन संस्था किंवा कंपनी यांनी छापलेल्या अभ्यासाच्या पुस्तकांच्या झेरॉक्स करून त्याच्या विक्रीचा प्रकार यातून समोर आला होता.