किव्ह – युक्रेनने केलेला क्रिमियाच्या पुलावरील ड्रोन हल्ला उधळवून लावल्याचे रशियाने म्हटले आहे. युक्रेनने हा पूल उद्ध्वस्त करण्यासाठी डागलेली नौदलाची 3 ड्रोन हवेतच पाडण्यात आल्याचे रशियाने म्हटले आहे. या पुलावर यापूर्वीही युक्रेनने दोन वेळा हल्ला केला होता.
आता तिसऱ्यांदा युक्रेनने या पुलाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. रशियाची राजधानी मॉस्को आणि क्रिमियाला जोडणाऱ्या यारुलावरून रशियाच्या सैन्य दलाच्या रसदची वाहतूक केली जात असते. त्यामुळे रशियासाठी हा पूल सुरक्षित राहणे महत्वाचे आहे.
दुसरीकडे रशियाने युक्रेनच्या ओडेसा भागातील एका बंदरावर हल्ला केला आहे. रशियाने धान्य वितरणाच्या कराराला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही युक्रेनच्या जहाजांनी काळ्या समुद्रातून धान्य वितरण सुरू ठेवल्याचा आरोप रशियाने केला होता. त्यानंतर काळ्या समुद्रातून केली जाणारी ही धान्य वाहतूक रोखण्यासाठी रशियाने ओडेसा प्रांतातील रेनी बंदरावर रॉकेटचा मारा केला आहे.
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी या करारासंदर्भात तुर्कीयेचे अध्यक्ष रेसिप इर्दोगन यांची भेट घेण्याचे निश्चित केले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट आणि कराराबाबतची चर्चा होण्यापूर्वीच रशियाने रेनी बंदरावर रॉकेट हल्ला केला आहे. रशियाने काळ्या समुद्रातून युक्रेनच्या धान्य वितरणाला परवानगी द्यावी,
यासाठी इर्दोगन यांनीच पुढाकार घेतला होता. दोन वेळा या कराराला रशियाने मुदतवाढ दिली होती. मात्र या कराराच्या आडून रशियाच्या निर्यात होणाऱ्या मालाला अन्य देशांकडून डावलले जात असल्याची टीका करून रशियाने या करारातून माघार घेतली होती.
रशियन सैन्याने रविवारी पहाटे डॅन्यूब नदीवर 25 इराणी बनावटीचे शाहेद ड्रोन डागले, त्यापैकी 22 हवाई संरक्षणाद्वारे पाडण्यात आले, असे युक्रेनियन हवाई दलाने सांगितले.
रशियाच्या भारतातील राजदूतांनी उडवली खिल्ली
भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी रविवारी रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव यांच्याबद्दल केलेल्या हलक्याफुलक्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. “जी-20′ परिषदेला अध्यक्ष पुतीन यांच्या ऐवजी सर्जेई लावरेव्ह येणार आहेत.
त्यांच्या भारतात येण्याबद्दल पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता अलीपा यांनी लावरोव्ह हे महिलांमध्ये प्रिय आहेत, असे मत व्यक्त केले होते. फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लब ऑफ साउथ एशिया येथे झालेल्या संवादादरम्यान केलेल्या या टिपण्णीने प्रेक्षकांना थक्क केले होते. आज त्यांनी आपल्या या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला.