शिक्रापूर – वढू बुद्रूक (ता. शिरूर) येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर विठ्ठल भंडारे, विनोद भंडारे, बंटी भंडारे, शहाजी भंडारे व इतर पाच (सर्व रा. वढू बुद्रूक, ता. शिरुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई अशोक सहादू जाधव यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
वढू बुद्रुक येथील संभाजी महाराज समाधी स्थळावर बंदोबस्तास पोलीस शिपाई अशोक जाधव हे होते. मंगळवारी (दि. 25) ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळा समोर काही युवक आरडाओरडा करत असल्याचे जाधव यांना दिसले. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता (एमएच 12 जेके 0840) या मोटरसायकलवर वाढदिवस करण्यासाठी केक ठेवलेला होता. यावेळेस तेथील युवकांकडून चौकशी केली असता गोरक्ष भंडारे यांचा वाढदिवस साजरा करत असल्याचे युवकांनी सांगितले.
याबाबत पोलीस शिपाई अशोक जाधव यांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली. युवकांवर करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान न करणे, सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणे यांसह आदी प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात केले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार पुनाजी जाधव हे करीत आहेत.