कल्याण – कल्याण येथील एका शिवसेनेच्या नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यामागे स्थानिक आमदारांचे कारस्थान असल्याचा आरोप संबंधित नगरसेवकाने केल्यामुळे आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. महेश गायकवाड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नगरसेवकाचे नाव असून ते कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे नगरसेवक आहेत.
महेश गायकवाड यांच्या प्रभागात सुरु असलेले केबलचं खोदकाम त्यांनी थांबवले होते. त्यानंतर महेश गायकवाड यांनी कामगारांना मारहाण करत खंडणी मागितल्याचा आरोप कंत्राटदाराने केल्याने त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र यानंतर स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्याविरोधात कारस्थान रचून हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला.
गणपत गायकवाड यांनी मात्र हे आरोप फेटाळत खोदकाम थांबवणे हे नगरसेवकाचे नव्हे, तर महापालिकेचे काम असल्याचे सांगितले. महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात राजकीय वैमनस्य असून विधानसभा निवडणुकीत महेश गायकवाड यांनी शिवसेना बंडखोर उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यामुळे या प्रकरणाची सध्या कल्याणमध्ये चर्चा सुरू आहे.