पुणे – विमाननगर येथील हॉटेलमध्ये अवैधरित्या चालु असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेने छापा टाकून हॉटेल मालकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. कारवाईमध्ये 2 लाख 3 हजारांचे हुक्का फ्लेवर्स, अकरा हुक्का पॉट, चिलीम पाईप व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
तलब हॉटेलचे मालक सचिन अशोक रणपिसे (30, रा. येरवडा), अमर संतोष गायकवाड (26) आणि हॉटेलचे व्यवस्थापक दिलीपकुमार मांगीलाल मालविया (26, रा. हडपसर) यांच्यावर सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादन कायदा 2018 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमाननगर येथील देवकर चौक येथील तलब हॉटेल मध्ये अवैधरित्या हुक्काबार चालु असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे खात्री करण्यासाठी अमंली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक विनायक गायकवाड आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या निरीक्षक शिल्पा चव्हाण यांचे पथक पोहचले.
त्यावेळी त्यांनी हॉटेलमधून हजारांचे हुक्का फ्लेवर्स, अकरा हुक्का पॉट, चिलीम पाईप व दोन दुचाकी जप्त केल्या. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.