भोर -भोर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलिसाने पाच बाटल्या बियरच्या व 5 हजार रुपये मागितल्याचे सांगून हॉटेल मालकाला दमदाटी करून खंडणी मागितल्याप्रकरणी रवी पांडुरंग खोपडे (रा. आंबेघर, ता.भोर), याच्यासह तीन जणांवर भोर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आपटी येथील हॉटेल ए-वनचे चालक आरिफ शेख याने याबाबत फिर्याद दिली आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी खोपडे व इतर तीन साथीदारांनी आपटी (ता. भोर) येथील हॉटेल ए-वनमध्ये मंगळवार (दि. 22 ) रात्री साडेआठच्या सुमारास गाडी (एमएच 12 केजे 0569) मधून गेले होते. तेथे हॉटेल चालक आरिफ शेख यास पाच बियर आणि पाच हजार रुपये भोर येथील एका पोलिसाने देण्यास सांगितले असून,
ते गाडीत बसले आहेत आणि त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या, असे सांगितले. मात्र, शेख यांनी यास नकार दिला. तेव्हा रवी खोपडे व साथीदारांनी खंडणी मागत शिवीगाळ करीत दमदाटी केली आणि मोबाइलद्वारे 5 बियरचे पैसे देत चौघेही तेथून निघून गेले. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे व हवालदार उद्धव गायकवाड करीत आहेत.