– अमित डोंगरे
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध यष्टीरक्षणात तर चांगली कामगिरी केलीच मात्र, फलंदाजीतही आपली आक्रमकता सिद्ध करताना वादळी अर्धशतक साकार केले. मात्र, लगेचच हरभजनसिंगपासून अनेकांनी सॅमसनला महेंद्रसिंह धोनीचा खरा वारसदार म्हणून संबोधायला सुरुवातही केली. अहो जरा थांबा इतक्यातच त्याची धोनीशी तुलना कशाला.
सॅमसनकडे गुणवत्ता नाही असे नाही; परंतु विक्रमादीत्य सुनील गावसकर काय किंवा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काय शतकात एकदा जन्माला येतात. धोनीही तसाच एकमेवाद्वितीय.
त्यामुळे सचिन गावसकरांसारखा नाही, कोहली सचिनसारखा नाही व निदान सध्यातरी कोणीही यष्टीरक्षक फलंदाज धोनीसारखा नाही ही वस्तूस्थिती आहे. हरभजनसिंगला मागे एकदा असे वाटले होते की त्याला खरेतर भारतीय संघाचे नेतृत्व मिळायला हवे. कसे असते आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी गोलंदाज म्हणून ओळख निर्माण झाली व संघात वरिष्ठ खेळाडूंकडूनही आदर मिळू लागला की प्रत्येकाला असेच वाटते आपण जसे यशस्वी खेळाडू आहोत तसेच यशस्वी कर्णघारही होऊ शकतो. पण असे नसते.
महान खेळाडू असूनही सचिन कधी यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला गेला नाही. त्यामुळे अशा चुलनाच अयोग्य असतात. प्रत्येक जण वेगळा असते, त्याची शैली वेगळी असते, त्याचा स्वभाव वेगळा असतो. धोनी केवळ एक चांगला यष्टीरक्षकच नव्हता तर बेस्ट फिनिशरही होता. एक कर्णधार म्हणून तर तो बारताचा सर्वात जास्त यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. राजस्थानचे आयपीएल स्पर्धेत नेतृत्व करणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणे यात खूप फरक आहे. सॅमसनला आजवर भारतीय संघात जीतकी संधी दिली त्यात त्याने काय केले ते आकडेवारी पाहीले की कळते.
त्यामुळे उगीच एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवायचेच कशाला. आयपीएल स्पर्धा संपली की सॅमसनसह कित्येक खेळाडू विस्मृतीत जातात ते थेट पुढील आयपीएल स्पर्धा आली की आठवतात. आयपीएल टू आयपीएल इतकीच त्यांची मजल आहे. धोनीसारखे खेळणे व प्रत्यक्ष धोनी असणे यात फरक आहे. तुलना करायचीच असेल तर ती सॅमसन व ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, ईशान किशन यांच्यात करा ते समकालीन आहेत. त्यांच्यात भारतीय संघात स्थान मिळवण्याची स्पर्धा आहे. धोनीशी तुलना करुन सॅमसनचे हसू करण्यापेक्षा हरभजनने या आयपीएल स्पर्धेतून देशाला किती खरे गुणवान खेळाडू मिळतील हे सांगावे.