दररोज 100 “आरटीपीसीआर’ सॅम्पल्सची होणार तपासणी
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असणाऱ्या “कोविड सॅम्पल टेस्टिंग’ला गुरुवारपासून सुरुवात झाली. त्यानुसार विद्यापीठात रोज 100 सॅम्पल्सची “आरटीपीसीआर’ चाचणी करता येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांच्या संकल्पनेतून व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या प्रयत्नातून आण्विक निदान संशोधन केंद्रात गुरुवारपासून प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात झाली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ एन. एस. उमराणी, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, सीए अतुल पाटणकर, डॉ. संजीव सोनवणे आदी उपस्थित होते.
डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, हे केंद्र सुरू करण्यासाठी विविध संस्थांच्या परवानग्या घेणे गरजेचे होते, त्यानुसार आयसीएमआर, आयबीएससी एएफएमसी, डीएमईआर, पीएमसी या सर्व संस्थांची परवानगी घेण्यात आली आहे.
केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. करिश्मा परदेशी म्हणाल्या, विद्यापीठाच्या विविध विभागांतील दहा प्राध्यापक यावर काम करत आहेत. या सर्व प्राध्यापकांनी मागील 4 महिने “आयसर’ या संस्थेत प्रत्यक्ष तपासणी प्रक्रियेत भाग घेत जवळपास दहा हजारांहून अधिक तपासण्या केल्या होत्या. यामध्ये डॉ. अभिजित कुलकर्णी, डॉ. विठ्ठल बारवकर, डॉ. स्मृती मित्तल, डॉ. वैजयंती ताम्हाणे आदी प्राध्यापक सहभागी झाले होते.
शंभर तपासणी क्षमता असणाऱ्या विद्यापीठातील या केंद्रात हॉस्पिटमधून रुग्णांचे सॅम्पल्स रोज येतील. 30 स्वयंसेवकांच्या मदतीने या सॅम्पल्सची तपासणी करून त्यांचे निकाल पाठवून दिले जातील. प्रत्यक्ष येणाऱ्या रुग्णाची येथे तपासणी केली जाणार नाही.
गुरुवारी झालेल्या चाचण्यांमध्ये “आयसर’मधील चाचण्यांचे पुनर्परीक्षण करण्यात आले. या तपासण्या हळूहळू वाढवण्यात येणार आहेत, असेही डॉ. परदेशी यांनी सांगितले.
आण्विक निदान संशोधन केंद्र विद्यापीठाच्याच एका इमारतीत, जैवशास्त्र विभागातील प्राध्यापक व विज्ञान विषयातील स्वयंसेवकांच्या मदतीने कमी खर्चात सुरू केले आहे. यासाठीचा सर्व निधी हा विद्यापीठाचा असून हे टेस्टिंग मोफत केले जात आहे.
– प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ