महापौरांच्या हस्ते लोकार्पण : गरजू व्यक्तींचे घरी जाऊन लसीकरण
पुणे – शहरातील अनेक रुग्णालयांत सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. मात्र, अनाथ, एचआयव्हीबाधित यांसह मानसिक किंवा इतर आजारांनी त्रस्त व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी महापालिकेने “वॅक्सिन ऑन व्हील्स’हा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी 5 व्हॅन्सचे लोकार्पण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरूवारी केले. या उपक्रमांतर्गत घरी जाऊन थेट लसीकरण करण्यात येणार आहे.
यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर सभागृह नेते गणेश बिडकर, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख आशीष भारती उपस्थित होते. या उपक्रमाला “सीएसआर’अंतर्गत “जिव्हीका हेल्थकेअर प्रा. लि’ आणि “माय वॅक्सिन’ या दोन्ही संस्थांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
“केंद्र सरकाराच्या आदेशानुसार पुणे शहरात महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे उपाय योजना करण्यात आल्या आहेत. आपल्या शहराला अधिकाधिक लसी कशा मिळतील, यासाठी सतत पाठपुरावा करत आहोत.
अनाथआश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग, एचआयव्ही बाधित बालक, यांसह मानसिक दृष्ट्या व्यक्ती जे घराबाहेर किंवा संस्थेच्या बाहेर पडू शकत नाही अशांसाठी या उपक्रमाअंतर्गत संबंधित व्यक्ती जिथे असेल, तेथे लसीकरण केले जाणार आहे.’