आळंदी- आळंदी पंचक्रोशीत करोनाचे रुग्ण वाढत असून जवळच रुग्णाचे आरोग्याची दक्षता घेणारी सोय व्हावी, यासाठी येथील शैक्षणिक वैभव असलेल्या एमआयटीत 100 बेडचे कोविड केअर सेंटर येत्या चार ते पाच दिवसांत सर्व सोयीनी सुसज्ज तयार केले जाणार आहे. आळंदी पंचक्रोशीतील करोनाबाधित रुग्णांची प्रशस्त जागेत सोय होणार असल्याची माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. जी. जाधव यांनी दिली.
आळंदी ग्रामीण रुग्णालय 30 बेडचे असून येथे ऑक्सीजन पाइपलाइनचे काम देखील करण्यात येत आहे. यामुळे गरजू रुग्णांची सोय स्थानिक ठिकाणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरपरिषदेसह या परिसरातील गावांतील रुग्णांची आरोग्य विषयक सोय शासनाचे मार्गदर्शक धोरणानुसार केली जाणार आहे.
यासाठी आळंदी परिसरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा देखील अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. यासाठी संबंधित व्यवसायिकांची बैठक घेण्यात आली. यात सुसंवाद साधण्यात आल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
याप्रसंगी मुख्याधिकारी अंकुश जाधव, आळंदी-चऱ्होली डॉक्टर्स फोरमचे अध्यक्ष विकास पाटील, अंबालाल पाटील यांचेसह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थितीत होते. उपस्थितांनी संवाद साधत अडचणी मांडल्या. यावर उपाययोजना तसेच दक्षता घेण्याची ग्वाही देण्यात आली.
आळंदीसह पंचक्रोशी करोनामुक्त व्हावी यासाठी नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये, सार्वजनिक व गर्दीचे ठिकाणी कायम मास्क वापरावा, प्रशासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करण्याचे आवाहन अर्जुन मेदनकर यांनी केले आहे.