मुंबई – महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात राहणाऱ्या ओमायक्रॉन करोना विषाणूची लागण झालेल्या राज्यातील पहिल्या रुग्णाची बुधवारी नकारात्मक चाचणी अहवाल आल्यानंतर या पहिल्या रुग्णास रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही दिलासादायक बातमी समोर आली आहे. योगायोगाने आज या रुग्णांना वाढदिवस सुद्धा आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी या रुग्णास मोठा दिलासा मिळाला आहे.
पेशाने इंजिनिअर आणि कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रहिवासी असलेला हा ३३ वर्षीय रुग्ण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतून दुबईमार्गे दिल्ली विमानतळावर पोहोचला होता.
24 नोव्हेंबर रोजी तो दक्षिण आफ्रिकेतून विमानाने नवी दिल्ली विमानतळावर आल्यावर त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. जेव्हा हा रुग्ण मुंबईला पोहोचला तेव्हा त्याचा कोविड-19 चा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.त्यानंतर महाराष्ट्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याच्या स्वॅबचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले असता त्यामध्ये त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पस्ट झाले होते.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे (केडीएमसी) आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांना सांगितले की, या रुग्णाला कल्याण शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते, तेथून बुधवारी सायंकाळी सहा वाजता त्यास डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, आज योगायोगाने त्या रुग्णाचा वाढदिवस होता. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 10 प्रकरणे समोर आली आहेत.